उत्तर प्रदेशमध्ये रविवारी विधानसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पडले. इतर चार टप्प्यातील निवडणुका बाकी असल्याने उत्तर प्रदेशमध्ये प्रचार सभा होत आहेत. यावेळी वादग्रस्त विधाने सुरूच आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर टीका केली आहे. अखिलेश यादव हे आजचे औरंगजेब आहेत असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशच्या रामपूर कारखाना विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या सभेला संबोधित करताना शिवराज सिंह चौहान यांनी हे वक्तव्य केले आहे.
“अखिलेश यादव हे आजचे औरंगजेब आहेत. जो वडिलांशी एकनिष्ठ राहू शकत नाही तो तुमच्याशी (मतदार) कसा एकनिष्ठ राहू शकतो?” असा सवाल मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विचारला आहे. “हे मी म्हणत नाही. मुलायम सिंह यादव म्हणाले होते की, जो व्यक्ती आपल्या वडिलांशी एकनिष्ठ राहू शकत नाही, तो तुमच्याशी (मतदार) कसा एकनिष्ठ राहू शकतो?,” असे म्हणत शिवराज सिंह यांनी आपल्या भाषणाचा व्हिडीओ ट्विट केला आहे.
“औरंगजेबानेही तेच केले. त्याने त्याचे वडील शहाजहान यांना कैद केले होते. त्याने आपल्या भावांना मारले होते. अखिलेश यांच्याइतका त्यांचा अपमान कोणीही केला नाही, असे मुलायमसिंह यादव म्हणाले होते,” असे चौहान पुढे म्हणाले. बाबा अखिलेश यांनी केलेल्या सर्व आघाड्या फ्लॉप होत्या. अखिलेश फ्लॉप चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत, असे शिवराज सिंह चौहान यांनी भाजपा उमेदवार सुरेंद्र चौरसिया यांच्या समर्थनार्थ प्रचार सभेत म्हटले.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत शिवराज सिंह चौहान म्हणाले की, “मग अखिलेश यांनी बहनजी (मायावती)सोबत हातमिळवणी केली. दोघे एकत्र सोबत आल्याने काही चमत्कार करू शकू असे त्यांना वाटले. पण जेव्हा निकाल लागला तेव्हा मावशी अशा प्रकारे पळून गेली की तिने आपल्या पुतण्याला पुन्हा कधीही पाहायचे नाही असा निर्णय घेतला आणि हा चित्रपटही फ्लॉप झाला.”
२००८ च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील एक दोषी आणि समाजवादी पक्ष यांच्यात संबंध असल्याचा आरोप शिवराज सिंह चौहान यांनी केला. बॉम्बस्फोटामध्ये ५६ लोक ठार आणि २०० जखमी झाल्या प्रकरणी न्यायालयाने ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.