उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे उमेदवार योगी आदित्यनाथ आज गोरखपूर (शहर) मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शाह हे देखील असणार आहेत. तर, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सर्व तयारी प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी पूर्ण केलेली आहे.
पाच वेळा माजी लोकसभेचे खासदार राहिलेले योगी आदित्यनाथ हे पहिल्यांदाच राज्य विधानसभेची निवडणूक उमेदवार म्हणून लढवत आहेत. तर, अमित शाह यांनी यापूर्वीच योगी आदित्यनाथ यांना पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलेलं आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या उमेदवारीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उत्तर प्रदेश भाजपचे प्रमुख स्वतंत्र देव हे देखील उपस्थित राहणार आहेत. तर,उमेदवारी दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री योगी महाराणा प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करून सभेला संबोधित करणार आहेत.