उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत, पण तरी देखील नेतेमंडळीचे पक्ष प्रवेश सुरूच आहेत. आता भाजपा खासदार रिटा बहुगुणा जोशी यांचे चिरंजीव मयंक जोशी यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. मयंक जोशी सपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरूच होत्या, या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. अखिलेश यादव यांनी आज निवडणुकीच्या व्यासपीठावरूनच मयंक जोशी यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा केली.
आझमगडमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना अखिलेश यादव यांनी मयंक जोशी यांचा सपामध्ये प्रवेश झाला असल्याची घोषणा केली. या घोषणेपूर्वीही दोघांची भेट झाली होती. रीटा बहुगुणा जोशी यांनी आपल्या मुलाला तिकीट मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण त्यांना अपयश आल्याचं सांगण्यात येत आहे.
गेल्या महिन्यात मयंक जोशी यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. तेव्हा ही भेट केवळ औपचारिक भेट असल्याचं सांगितलं गेलं होतं. मयंक यांना भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांच्या नाराजीच्या बातम्या येत होत्या व ते समाजवादी पार्टीत प्रवेश करू शकतात, असे बोलले जात होते. मात्र, त्यानंतर रिटा बहुगुणा यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते आणि त्यांच्या मुलाने पक्ष सोडल्याची बातमी केवळ अफवा असल्याचे म्हटले होते.