उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांच्यावर हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली आहे. आम्ही दोन मुलांचा खेळ याआधी पाहिला होता, त्यांच्यात एवढा अहंकार आला की त्यांनी गुजरातची दोन गाढवं असा शब्द वापरला. पण उत्तर प्रदेशने त्यांना धडा शिकवला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभेसाठी गुरुवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्या दिवशी, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. उत्तर प्रदेश विधानसभेच्या ५८ जागांवर गुरुवारी मतदान होणार आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदींनी हल्लाबोल केला. “आम्ही दोन मुलांचा खेळ यापूर्वी पाहिला होता. त्याच्यात एवढा अहंकार होता की त्यांनी ‘गुजरातके दो गधे (गाढव)’ असे शब्द वापरले. उत्तर प्रदेशच्या जनतेनं त्यांना उत्तर दिलं होतं. एकदा तर दोन तरुण आणि एक बुवाजी देखील त्यांच्यासोबत होत्या. पण तरी देखील फार काही होऊ शकलं नाही,” असे पंतप्रधान म्हणाले.
भाजपा नेहमीच जनतेच्या सेवेत व्यस्त आहे. आम्ही सत्तेत असताना ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊन काम करतो. मला सर्व राज्यांमध्ये भाजपाची लाट दिसत आहे. आम्ही प्रचंड बहुमताने विजयी होऊ आणि पाच राज्यातील जनता आम्हाला त्यांच्या सेवेची संधी देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
जिथे जिथे भाजपाला स्थिरतेने काम करण्याची संधी देण्यात आली आहे, तिथे तुम्हाला सत्ताविरोधी नव्हे तर प्रो-इन्कम्बन्सी मिळेल. भाजपा नेहमीच प्रो-इन्कम्बन्सी घेऊन निवडणुकीत उतरतो, असेही पंतप्रधान म्हणाले.
“भाजपा हार-पराजय स्विकारूनच निवडणुका जिंकायला शिकला आहे. आम्ही अनेक पराभव पाहिले आहेत. मी राजकारणात नव्हतो आणि मला आठवते की एकदा जनसंघाचे लोक मिठाईचे वाटप करत होते, तेव्हा मला वाटले, हरलेलो असताना असे का होत आहे? तेव्हा सांगण्यात आले की आमचे तीन जागांवर डिपॉझिट जप्त होण्यापासून वाचले आहे,” असे मोदी म्हणाले