उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की ही निवडणूक “८० विरुद्ध २०” ची असेल. योगी आदित्यनाथ यांनी नोंदवलेले आकडे उत्तर प्रदेशातील हिंदू आणि मुस्लिमांच्या प्रमाणाशी जुळतात, जेथे पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
राजधानी लखनऊमध्ये एका खाजगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ब्राह्मण मतांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “निवडणूक यापेक्षा खूप पुढे गेली आहे. आता ही निवडणूक ८० विरुद्ध २० अशी आहे.” त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणाले की, ओवेसी यांनी ते ९० टक्के असल्याचे सांगितले आहे. योगी आदित्यनाथ यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं, “लढा आता ८० आणि २० आहे, जे सुशासन आणि विकासाचे समर्थन करतात, ८० टक्के भाजपसोबत आहेत आणि जे शेतकरी विरोधी आहेत, विकासविरोधी आहेत, गुंडांना, माफियांना पाठिंबा देतात. ते २० टक्के विरोधकांसोबत आहेत”.
हेही वाचा – “हिंदूंची घरं जळाली तर मुस्लिमांची घरं सुरक्षित कशी राहतील?”; योगी आदित्यनाथ यांचं विधान
आपल्या कार्यकाळात आपण राज्यात एकही दंगल होऊ दिली नाही, असं विधानही योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. ते म्हणाले, “जेव्हा दंगल होते, तेव्हा प्रत्येक धर्माच्या, पंथाच्या लोकांना त्याचा फटका बसतो. जर हिंदूंची घरं जळाली तर मुस्लिमांची घरं तरी कशी सुरक्षित राहतील. हिंदू सुरक्षित राहिला तर मुसलमान सुरक्षित राहील. आम्ही आमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दंगल होऊ दिली नाही”.