नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवार निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीत दाखल झाले असताना, मंगळवारी समाजवादी पक्षाने भाजपला जोरदार धक्का दिला. योगींच्या सरकारमधील कामगार कल्याणमंत्री व ओबीसी समाजातील प्रबळ नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला. मौर्य यांचे समर्थक व भाजपचे तिंदवारीचे आमदार ब्रजेश प्रजापती यांच्यासह अन्य दोन आमदारांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली़
‘‘वैचारिक मतभेद आणि प्रतिकूल परिस्थितीतही मी योगी सरकारमध्ये कामगार कल्याणमंत्री म्हणून जबाबदारीने काम केले. पण दलित, मागासवर्ग, शेतकरी, बेरोजगार तरुण अशा अनेक समाजांच्या मागण्यांकडे योगी सरकार दुर्लक्ष करत आहे. त्याचा निषेध म्हणून मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे,’’ असे स्वामी प्रसाद मौर्य यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना दिलेल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे. राजीनाम्यानंतर मौर्य यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली. यादव यांनी मौर्य यांचे समाजवादी पक्षात स्वागत केले. आमदार ब्रजेश प्रजापती यांनीही भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला़
मौर्य यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रोशनलाल वर्मा आणि भगवती सागर हे दोन आमदारही समाजवादी पक्षात जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल पटेल यांची व त्यानंतर अखिलेश यादव यांची मौर्य यांनी घेतलेल्या भेटीवेळी रोशनलाल वर्मा हेदेखील उपस्थित होते.
सामाजिक न्याय व समतेसाठी लढणाऱ्या लोकप्रिय नेत्यांपैकी स्वामी प्रसाद मौर्य असून, त्यांच्याबरोबर समाजवादी पक्षामध्ये येणारे अन्य नेते, कार्यकर्ते, समर्थक यांचे हार्दिक स्वागत आहे, असे ट्वीट अखिलेश यादव यांनी केले. त्यामुळे भाजपमधील अन्य काही नेतेही सपमध्ये जाणार असल्याची चर्चा आह़े.
प्रबळ ओबीसी नेता
उत्तर प्रदेशातील मौर्य व कुशवाह या ओबीसी समाजाचे प्रमुख नेते असलेले स्वामी प्रसाद मौर्य हे योगी सरकारमध्ये कामगार मंत्रालय सांभाळत होते. ते २०१६ मध्ये भाजपमध्ये आले, त्यापूर्वी मौर्य बहुजन समाज पक्षात होते व मायावतींच्या अत्यंत नजीकचे मानले जात. २०१२ ते १६ या काळात ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. पाचवेळा आमदार झालेले मौर्य बसपचे प्रदेशाध्यक्षही होते. २०१७ मध्ये कुशीनगर जिल्ह्यातील पडरौना विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून, यापूर्वीही दोन वेळा या मतदारसंघातून ते विधानसभा सदस्य बनले होते. स्वामी हे मौर्य समाजाचे नेतृत्व करणाऱ्या उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या तुल्यबळ मानले जातात. ‘‘स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनाम्याचा निर्णय का घेतला हे माहीत नाही. घाईघाईत घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात,’’ अशी प्रतिक्रिया केशव मौर्य यांनी व्यक्त केली.
कन्या संघमित्रा मात्र भाजपमध्येच!
मौर्य यांची कन्या संघमित्रा मौर्य भाजपच्या खासदार असून, बदायूँ लोकसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत. मागासवर्ग यादी तयार करण्याचा अधिकार राज्यांना पुन्हा बहाल करण्याच्या विधेयकावरील चर्चेत संघमित्रा यांनी ओबीसी जनगणनेची मागणी लोकसभेत करून भाजपच्या अधिकृत भूमिकेविरोधात मत व्यक्त केले होते. मौर्य सपमध्ये गेले असले तरी संघमित्रा मात्र भाजपमध्ये राहणार असल्याचे मौर्य यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपची यादी दोन-तीन दिवसांत
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान १० फेब्रुवारी रोजी होणार आह़े त्यासाठी १४ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरता येतील़ २७ जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी १४ किंवा १५ जानेवारी रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवारांच्या निवडीसाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत लखनऊ येथे २४ सदस्यांच्या निवड समितीची बैठक झाली. प्रदेश भाजपने तयार केलेल्या उमेदवारांच्या नावांच्या छाननीसाठी मंगळवारी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, संघटक महासचिव सुनील बन्सल आदी नेते उपस्थित होते.
‘मायावती निवडणूक लढवणार नाहीत’
लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती या आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे पक्षाचे नेते सतीशचंद्र मिश्रा यांनी मंगळवारी जाहीर केले. पाच राज्यांत पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी मायावती प्रचार करणार आहेत, त्यामुळे निवडणूक लढवणार नसल्याचे मिश्रा यांनी नमूद केले. बसप उत्तर प्रदेशातील सर्व ४०३ जागा स्वबळावर लढणार आहे. पंजाबमध्ये अकाली दलाशी बसपची युती आहे.