उत्तर प्रदेशमध्ये २०२२ च्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सर्वच पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. त्याचवेळी, निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आयपी सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी गोरखपूरसाठी विमानाचे तिकीट बुक केले आहे. तसेच, त्यांनी तिकीट सुरक्षित ठेवावे, असे म्हटले आहे.
सपा नेते आयपी सिंह यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी, १० मार्चला सामान्यांचा दिवस असेल, १० मार्चला राज्यात सत्याचा सूर्य उगवेल आणि सपा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल, असे म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, “मी योगी आदित्यनाथजींसाठी ११ मार्चला लखनऊ ते गोरखपूरचे रिटर्न तिकीट बुक केले आहे, हे तिकीट तुमच्याकडे ठेवा, कारण पराभवानंतर भाजपाही तुम्हाला विचारणार नाही.”
सिंह यांच्या या ट्विटनंतर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. सिंह यांचे ट्विट रिट्विट करताना एका यूजरने, ‘तुमचे तिकीटही त्याच्यासोबत काढून घ्या, ट्रेनमध्ये खूप व्हेटिंग सुरू आहे कारण योगीजी पुन्हा येणार आहेत, असे म्हटले आहे. तर दुसर्या यूजरने, १० मार्चला काय होईल, हे येणारा काळच सांगेल. मात्र ज्या पद्धतीने प्रचार सुरू आहे, त्यात भाजपा नेते गुजरातमधील एका व्यक्तीला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करत आहेत. त्यामुळे भगव्याच्या विचारात मते टाकण्याचा विचार करणार्यांनी लक्षात ठेवावे की, जिंकूनही संधी मिळेलच याची शाश्वती नाही, असे म्हटले.
दुसरीकडे, आयपी सिंह यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपाचे अनेक कार्यकर्ते आयपी सिंह यांच्यावर हल्ला करत असताना समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते त्यांना साथ देत आहेत. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात कोणाचे सरकार बनते हे येणारा काळच सांगेल. मात्र निवडणुकीपूर्वीच राजकीय पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे.
दरम्यान, शनिवारी भारतीय निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश मध्येही आचारसंहिता लागू झाली आहे. उत्तर प्रदेशातील ४०३ विधानसभा जागांसाठी सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये १० फेब्रुवारीपासून मतदान सुरू होईल, जे सात मार्चपर्यंत चालेल आणि १० मार्च २०२२ रोजी मतमोजणी होईल.