गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. भाजपाने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याची जोरदार चर्चा सुरू होती. शिवसेना, आम आदमी पार्टी यांच्याकडून त्यांना खुली ऑफरही देण्यात आली होती. मात्र आता त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पणजी जागेसाठी उत्पल पर्रिकर अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना उत्पल पर्रिकर म्हणाले, मला माझ्या वडिलांचं काम पुढे न्यायचं आहे. मी पणजीतल्या लोकांसाठी २०० टक्के देऊन काम करीन. ते मला पाठिंबा देतील याची मला खात्री आहे. निवडणूक जिंकण्याविषयीच्या विश्वासाबद्दल विचारणा केली असता पर्रिकर म्हणाले, पणजीच्या लोकांचा मला पाठिंबा आहे. पणजीच्या भविष्यासाठी ते मला नक्कीच मतं देतील.
गोव्यामध्ये १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे.
उत्पल यांना भाजपाने निवडणुकीत उमेदवारी नाकारली आहे़ उत्पल हे इच्छुक असलेल्या पणजी मतदारसंघातून भाजपाने बाबूश मॉन्सेरात यांना उमेदवारी दिली़ यामुळे उत्पल हे काय निर्णय घेणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. उत्पल यांनी पणजी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती़. मात्र, त्यांच्याऐवजी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बाबूश यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली़. उत्पल यांना भाजपाने अन्य दोन मतदारसंघांचे पर्याय दिले होते़. मात्र, त्यांना ते अमान्य होते. त्यामुळे त्यांनी बंड करत अपक्ष लढण्याचा पर्याय निवडला आहे.