उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याची ताकद सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यात नाही, अशी टीका एआयएमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर ते उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार ताशेरे ओढले आणि राज्यातील शेतकऱ्यांना भटक्या गुरांचा होणारा त्रास त्यांना निवडणुकीच्या वेळीच कळला का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडे भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्याची ताकद नाही. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत यादव यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी बहुजन समाज पार्टीशी युती केली. पण तरीही ते भाजपाला सरकार स्थापन करण्यापासून रोखू शकले नाहीत,” असे ओवेसी म्हणाले. त्यांनी सिकंदरपूर भागात एका सभेला संबोधित करताना हे वक्तव्य केलं.
एकेकाळी स्वतःला चौकीदार म्हणवणारे आता बादशाह झाले आहेत, असं म्हणत त्यांनी त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. “पंतप्रधान मोदी गेल्या सात वर्षांपासून चहापान करण्यात इतके व्यस्त आहेत की त्यांना निवडणुकीच्या वेळीच राज्यातील भटक्या गुरांच्या समस्येची जाणीव झाली. भाजपाने खोटे बोलून राज्यात सत्ता स्थापन केली होती,” असा आरोपही ओवेसी यांनी केला.
१० मार्चला मतमोजणीच्या दिवशी भगवा पक्ष उत्तर प्रदेशात संपून जाईल, असं ते म्हणाले.