देशात सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. त्यात फोडाफोडीच्या राजकारणालाही वेग आला आहे. निवडणुकांच्या तारखा जवळ आल्याने सर्वच पक्षांकडून आता उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार यांची सर्वांनाच उत्सुकता होती. आजच्या नावांच्या यादीत योगी आदित्यनाथ यांना पक्षाने गोरखपूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. यावरून समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी योगींना टोला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“कधी कधी ते म्हणायचे की ते अयोध्येतून लढतील, मथुरेतून लढतील, प्रयागराजमधून लढतील… की भाजपाने निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच त्यांना आधीच गोरखपूरला पाठवलं, हे मला आवडलं. आता योगींनी तिथेच राहावे, तिथून येण्याची गरज नाही,” असं अखिलेश यादव यांनी म्हटलंय.

UP election : मुख्यमंत्री योगीं ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार ; भाजपाने जाहीर केली पहिली यादी

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी युती न केल्याच्या घोषणेवर अखिलेश म्हणाले, “ते काल माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितले की, ते निवडणूक लढवणार आहे. मी लोकदलाशी बोललो आणि त्यांना गाझियाबाद आणि रामपूर मणिहरनच्या जागा दिल्या. नंतर ते कुणाशी तरी फोनवर बोलून म्हणाले, आता निवडणूक लढवता येणार नाही. कोणाचा फोन होता?कुणाचा कट होता? माहित नाही. म्हणूनच मी म्हणतोय की आता आम्ही सपामध्ये कोणत्याही पक्षाचा आमदार किंवा नेता घेणार नाही. आता कोणाला सोबत घेण्याला वाव उरलेला नाही. खूप त्याग करून आम्ही लोकांना एकत्र आणले आहे,” असं त्यांनी सांगितलं.  

दरम्यान, करोनाचे नियम तोडल्याच्या आरोपांवर ते म्हणाले, “मी सर्वांना आवाहन करतो की, सर्वांनी करोना नियमांचे पालन करावे. सर्वांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. मी सर्व कार्यकर्त्यांना तिकिटासाठी लखनऊला येऊ नका, असे सांगत आहे.”

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhilesh yadav slams yogi says do not come back from gorakhpur hrc