उत्तर प्रदेशमधील सोनभद्र विधानसभा मतदारसंघासाठी सातव्या टप्प्यामध्ये म्हणजेच सात मार्च रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांसाठी प्रचार अद्याप सुरु आहे. प्रत्येक पक्षाचे नेते वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करण्यात व्यस्थ आहेत. जनतेने आपल्याला मत द्यावं यासाठी वेगवेगळ्या कल्पना नेत्यांकडून वापरल्या जात आहेत. मात्र येथील रॉबर्ट्सगंजच्या जागेवरुन निवडणूक लढणारे आमदार आणि उमेदवार भूपेष चौबे यांनी एका भलत्याच पद्धतीने मतं मागितली आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रचारसभेमध्येच भूपेश चौबे खुर्चीवर उभे राहिले आणि त्यांनी स्वत:चे कान पकडले. त्यानंतर त्यांनी खुर्चीवरच उठाबशा काढण्यास सुरुवात केली. पाच वर्षांमध्ये आमदार म्हणून केलेल्या चुकांसाठी चौबे यांनी जनतेची उठाबशाकडून माफी मागितली.
भाजपाचे उमेदवार भूपेश चौबे यांनी यावेळी दिलेल्या भाषणामध्ये जनतेने आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं. ज्या पद्धतीने तुमच्यासारख्या देवतुल्य कार्यकर्त्यांनी २०१७ च्या निवडणुकीमध्ये त्यांचा आशीर्वाद दिला होता तसाच आशीर्वाद यावेळीही द्यावा. तुमच्या आशीर्वादानेच राबर्ट्सगंज विधानसभा मतदारसंघामध्ये कमळ फुलेले आणि इथला विकास होईल, असं चौबे म्हणाले. केवळ एवढ्यावरच न थांबता ते कान पकडून उठाबशा कढून जनतेची माफी मागू लागले.
चौबे यांच्या या सभेसाठी मुख्य पाहुणे म्हणून झारखंडचे माजी आरोग्य मंत्री आणि आमदार भानू प्रताप शाही सुद्धा उपस्थित होते. भानू प्रताप यांनी भाजपाला मत देण्याचं आवाहन करताना आपली लढाई ही समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीशी नसून ओवैसीसारख्या लोकांविरुद्ध आणि काँग्रेसविरुद्ध आहे, असं कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हटलं. विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या पहिल्या तीन टप्प्यांमध्ये सपा आणि बसपा हे पक्ष अर्ध्यावर आले आहेत. सातव्या टप्प्यापर्यंत त्यांचा पूर्णपणे सुपडा साफ होणार आहे, असंही भानू प्रताप शाही म्हणाले.