नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी जेमतेम दोन आठवडे उरले असताना निवडणूक प्रचारात पुन्हा एकदा जिन्ना आणि पाकिस्तान या दोन मुद्दय़ांचा शिरकाव झाला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या ‘पाकिस्तान हा फक्त राजकीय शत्रू’ या टिप्पणीवर सोमवारी भाजपने तीव्र आक्षेप घेतला असून ‘जिसे जिन्ना से हो प्यार वो पाकिस्तान से कैसे करे इन्कार’ अशी उपहासात्मक टिप्पणी केली.
डॉ. राम मनोहर लोहिया, मुलायम सिंह यादव यांची चीनबाबत भूमिका स्पष्ट असून चीन हाच भारताचा खरा शत्रू आहे. पाकिस्तान हा फक्त राजकीय शत्रू आहे. भाजप पाकिस्तानला मतांच्या राजकारणासाठी लक्ष्य बनवत आहे, असे मत अखिलेश यादव यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
जम्मू-काश्मीरच्या विधानसभेतील २४ जागा पाकव्याप्त काश्मीरमधील आहेत, त्या कधी भरल्या जातील, असा प्रश्न फक्त समाजवादी पक्षाने लोकसभेत केला होता. त्यावर, आपण अक्साई चीनपर्यंत धडक मारू असे उत्तर तत्कालीन संरक्षणमंत्र्यांनी दिले होते. पण, आता चीनने गलवानमधील भूभाग ताब्यात घेतला आहे. चीनसारख्या सर्वात धोकादायक शत्रूबरोबर आपल्याला उद्योग-व्यापार करावा लागत आहे, असा मुद्दा मांडत अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारला लक्ष्य बनवले. त्यांच्या विधानांवरून भाजपने अखिलेश यादव यांच्यावर आगपाखड केली आहे.
माफीची मागणी
‘भारताचा शत्रू हा तुमचा (अखिलेश यादव) शत्रू नव्हे का? पाकिस्तानबद्दल तुम्हाला इतके प्रेम का वाटू लागले आहे?’, अशी प्रश्नांची सरबत्ती भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी सोमवारी केली. नोव्हेंबरमध्ये अखिलेश यादव यांच्या जिन्नांसदर्भातील कथित विधानांवरूनही वाद निर्माण झाला होता. त्याचा संदर्भ देत, जिन्ना ते पाकिस्तान असे अनुनयाचे वर्तुळ अखिलेश यांनी पूर्ण केल्याचा आरोप पात्रा यांनी केला. मुस्लीम मतांसाठी अखिलेश यांनी अनुनयाचे टोक गाठले आहे. त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असे पात्रा म्हणाले.
गुंडांना उमेदवारीचा आरोप
समाजवादी पक्षाने गुंडांना उमेदवारी दिल्याचा आरोपही पात्रा यांनी केला. दहशतवादी कसाब आणि याकूब मेमन या दोघांना फाशी दिली हे बरे झाले अन्यथा अखिलेश यांनी याकूब मेमनलाही उमेदवारी दिली असती, अशी टीका पात्रा यांनी केली. कैराना मतदारसंघात नाहिद हसन या तुरुंगात असलेल्या कथित गुंडाला ‘सप’ने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पाकिस्तानबद्दल प्रेम, गुंडांना उमेदवारी हे बघितले तर अखिलेश यांच्याकडे नैतिक बळ उरले नसल्याची टीकाही पात्रा यांनी केली.