सध्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी सभा, रॅलींचा धडाका लावला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील ट्विटरवर एक फोटो शेअर करत तो इटावाचा असल्याचं म्हटलं. मात्र, या फोटोत समोर दिसणारी गर्दी वेगळ्याच दिशेला हात करत आहे, तर योगी गर्दीच्या डावीकडून हात करताना दिसत आहे. त्यामुळेच हा फोटो एडीट केल्याचा आरोप होतोय. तसेच यावर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया येत आहे. प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराने देखील रिट्वीट करत या फोटोवरून योगींवर निशाणा साधला आहे.
कुणाल कामरा म्हणाला, “तुमच्या पक्षाकडे ५,००० कोटी रुपयांची देणगी आहे. किमान एक फोटोशॉपवाल्याला तरी नोकरीवर ठेवलं असतं.”
अल्ट न्यूज या फॅक्ट चेकिंग संकेतस्थळाचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्या फोटोबाबत ट्वीट करत हा फोटो एडिटेड असल्याचं म्हटलंय. त्यांनी हा फोटो डिसेंबर २०२१ मधील १ कोटी स्मार्टफोन वाटपाच्या कार्यक्रमातील असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा : “भाजपाला मत न देणाऱ्यांसाठी योगींनी जेसीबी आणि बुलडोझर मागवले आहेत”; भाजपा आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
एकूणच सोशल मीडियावर योगी आदित्यनाथ यांनी शेअर केलेल्या फोटोवर प्रतिक्रियांचा पाऊस आला आहे. कुणी योगींचा फोटोशॉपवाल्याची नोकरी जाणार असं म्हणतंय तर कुणी भक्तांना याचंही समर्थन करावं लागणार असल्याचं म्हणत टोले लगावत आहे.