उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी गोरखपुरमधील एका दलित कुटुंबाच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे योगी आदित्यनाथ यांनी दुपारी झूमिया गेट येथील गोरखपूर फर्टिलायझरमध्ये पोहोचले. येथे त्यांनी पक्षाचे कार्यकर्ता असणाऱ्या अमृतलाला भारती यांच्या घरी जेवण केलं. यावेळेस योगींनी सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या. योगींच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगली चर्चा आहे. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र यावरुन योगींवर निशाणा साधलाय.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन योगी आदित्यनाथांचा फोटो शेअर करत दोन गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे. योगी आदित्यनाथ यांचा चर्चेत असणाऱ्या फोटो शेअर करत मलिक यांनी फोटोमधील पत्रावळी आणि कुल्हडवरुनच दलिताच्या घरी जेवणाचा कार्यक्रम हा केवळ दिखावा असल्याचा टोला लगावलाय. “पत्रावळी आणि कुल्हडवरुनच दलिताच्या घरी जेवण करणं हा केवळ दिखावा असल्याचं स्पष्ट होतंय. असं ऐकण्यात आलंय की स्वयंपाक्या आणि जेवणाची व्यवस्थाही भाजपाने केली होती. धन्य आहात महाराज,” असं नवाब मलिक यांनी म्हटलंय.
उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या ४०३ जागांवर सात टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. १० फेब्रुवारीपासून मतदानाला सुरुवात होणार असून सात मार्चपर्यंत टप्प्याटप्प्यांमध्ये मतदान होईल. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाने दलित कार्यकर्त्याच्या घरी मुख्यमंत्र्यांच्या भोजनाचा कार्यक्रम आयोजित करुन दलित कार्ड खेळल्याची चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये आहे.