उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करणाऱ्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास होळी आणि दिवाळीला मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केलीय. याशिवाय विद्यार्थीनींना स्कुटी देणार असल्याचीही घोषणा राजनाथ सिंह यांनी केली. ते उत्तर प्रदेशमधील मनकापूरमध्ये एका सभेत बोलत होते. मनकापूर गोंडा जिल्ह्यात येतं. या ठिकाणी ५ व्या टप्प्यात २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
मनकापूरमधून भाजपाने आपल्या विद्यमान आमदार रमापती शास्त्री यांच्यावरच विश्वास टाकत तिकिट दिलंय. शास्त्री सध्याच्या योगी सरकारमध्ये मंत्री देखील आहेत.
“भाजपा देशाच्या सन्मानासोबत कोणतीही तडजोड करत नाही”
राजनाथ सिंह म्हणाले, “दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला तेव्हा सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्यात आला. भाजपा देशाला निराश करणार नाही. भाजपा देशाच्या सन्मानासोबत कोणतीही तडजोड करत नाही. ब्रह्मोसची निर्मिती उत्तर प्रदेशमध्ये होईल. हे एक असं क्षेपणास्त्र आहे ज्याला शत्रू घाबरतो.”
“राज्य आणि केंद्र सरकारविरोधात कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही”
“सीएए इतर ठिकाणी त्रास देण्यात येणाऱ्या नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठी आणला आहे. भाजपाने आपलं आश्वासन पूर्ण केलं आहे. अयोध्यात राम मंदीर निर्माण केलं जात आहे. राज्य आणि केंद्र सरकारविरोधात कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. याचा अर्थ सरकार लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहे. आम्हीच खरे समाजवादी आहोत, कारण आम्ही प्रत्येक व्यक्तीला रेशन आणि पेंशन देत आहोत,” असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
हेही वाचा : विश्लेषण : उत्तर प्रदेश मतदान तिसरा टप्पा : ‘यादव पट्ट्यात’ अखिलेश यांचे भवितव्य ठरणार?
“मोदी सरकार शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी देतं. हा निधी वाढवून पुढे वर्षाला १२ हजार इतका केला जाणार आहे. योगी सरकार सत्तेत आल्यावर विद्यार्थीनींना स्कुटी दिली जाईल,” असंही राजनाथ सिंह यांनी नमूद केलं.