राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी) म्हणजेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेलं आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीच पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजेपासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करुन केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधलाय.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने विधानसभेचे सभापती हृदय नारायण दिक्षित आणि मंत्री स्वाती सिंह यांच्याबरोबर दोन आमदारांना तिकीट नाकारलं आहे. पक्षाने ईडीचे सहनिर्देशक राजेश्वर सिंह यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केल्याच्या दुसऱ्या दिवशीच निवडणुकीचं तिकीट देऊ केलं आहे. सिंह यांचा अर्ज स्वीकारण्यात आल्यानंतर त्यांना तिकीट देण्यात आलंय. या बातमीचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधलाय.
“सेवेत असताना आम्ही सांगेल ती कामं करा आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला आमदारकी, खासदारकीचं बक्षीस देऊ, ही केंद्रीय संस्थांमधील अधिकाऱ्यांबाबत भाजपची मोडस ऑपरेंडीच बनली की काय असं वाटंत होतं. पण काही दिवसांपासून ही वस्तुस्थिती असल्याचं दिसतंय,” अशा कॅप्शनसहीत रोहित पवारांनी सिंह यांना तिकीट मिळाल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉर्ट शेअर केलाय.
दरम्यान आज मुंबईमध्ये ईडीने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने भाजपावर निशाणा साधत टिका केलीय. नवाब मलिक हे खरं बोलत असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई केली जात असल्याचा आरोप अनेक भाजपाविरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलाय.