लखनौ  : समाजवादी पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी गुंड, समाजकंटकांना उमेदवारी दिली असून हे नकली समाजवादी सत्तेवर आले, तर केंद्र सरकारने गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या योजनांचे लाभ मधल्या मध्ये हडप करतील, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांशी आभासी संवाद साधताना जनचौपाल या प्रचार कार्यक्रमात केला.

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी यांची ही आभासी सभा झाली. दाखलेबाज गुन्हेगारांना बाजूला ठेवून मतदारांनी या निवडणुकीत इतिहास घडवावा, असे ते म्हणाले. त्यांनी भाजप सरकारने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले काम आणि शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आता मतदानाच्या दिवशी लोकांनी मोठय़ा संख्येने घराबाहेर पडावे. आधी मतदान आटोपून नंतरच भोजन करावे (पहले मतदान, फिर जलपान), असे आवाहन त्यांनी केले. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी १० फेब्रुवारीला मतदान होणार आहे.  पंतप्रधानांनी घेतलेली ही दुसरी आभासी सभा होती.

 यात गाझियाबाद, मीरत, हापूर, अलीगड आणि नोईडातील मतदारांशी प्रामुख्याने संवाद साधण्यात आला.

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने माफिया- गुन्हेगारांचा कठोरपणे बंदोबस्त केला आहे. या गुन्हेगारांना पाठीशी घालणारे सरकार जर पुन्हा सत्तेवर आले, तर हे गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांशी सुडाच्या भावनेने वागतील. गेल्या पाच वर्षांत राज्याला डबल इंजिन सरकारचा फायदा झाला आहे. नरेंद्र मोदी, पंतप्रधान