उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पैज लावलेल्या एका कार्यकर्त्याची अखिलेश यादव यांनी भेट घेतली. यात विशेष गोष्ट अशी की या व्यक्तीने समाजवादी पार्टीवर पैसे लावले होते. मात्र निकालानंतर समाजवादी पार्टी हरल्याचं समोर आलं आणि हा व्यक्ती हरला. त्यामुळे त्याला आपली गाडी गमवावी लागली.
समाजवादी पार्टीला पाठिंबा देणाऱ्या अवदेशने एका भाजपा समर्थकाबरोबर निवडणुकीच्या निकालासंदर्भात पैज लावली होती. अवदेशने आपली गाडी आणि भाजपा समर्थकाने आपला टेम्पो पणाला लावला होता. मात्र राज्यात भाजपा जिंकून आल्याने अवदेश ही पैज हरला आणि त्यामुळे त्याला आपली गाडी गमवावी लागली.
अवदेशने एएनआयशी बोलताना सांगितलं की, त्याने ज्यावेळी आपली गाडी भाजपा समर्थकाला दिली, त्यानंतर त्याला अखिलेश यादव यांचा फोन आला. त्यांनी अवदेशला सोन्याची चेन भेट दिली आणि इथून पुढे अशा कोणत्याही पैजा न लावण्याचा सल्लाही दिला.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) अखिलेश यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाचा पराभव केल्याने योगी आदित्यनाथ यांना सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला. मागील विधानसभा निवडणुकांपेक्षा सपाने आपलं मताधिक्य वाढवलं असलं, तरी ते निम्म्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत.