नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात भाजप ८० आमदारांना उमेदवारी नाकारण्याची शक्यता आहे. उमेदवार निवडीबाबत सोमवारी नवी दिल्ली पक्ष मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या वेळी गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. मंगळवारी पंतप्रधानांच्या उपस्थितीत केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब होईल.
उत्तर प्रदेशातील ४०३ पैकी ३८० जागा भाजप लढण्याची शक्यता आहे. उर्वरित जागा अपना दल (सोनेलाल) तसेच निशाद पक्षाला दिल्या जातील. आतापर्यंत भाजपने १९७ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. जिंकण्याची क्षमता हा एकमेव निकष आमदाराला उमेदवारी नाकारण्याबाबत आहे, असे पक्ष सुत्रांनी सांगितले. गेल्या वेळी भाजपने ३१२ जागा जिंकल्या होत्या. मतदारसंघातून आलेल्या माहितीच्या आधारे निर्णय घेतला जाणार आहे. मोठय़ा प्रमाणात आमदारांना उमेदवारी नाकारण्याबाबत पक्ष नेतृत्वाचे प्रयत्न होते. मात्र अलीकडे अनेक आमदारांनी पक्षांतर केल्याने भाजपवर दबाव आल्याने परिस्थिती बदलल्याचे सांगितले जाते. अपना दलने गेल्या वेळी ११ जागा लढविल्या होत्या. या वेळी ते अधिक जागा मागत आहेत. मात्र गेल्या वेळच्या तुलनेत त्यांना दोन ते तीन जागा अधिक देण्यात येतील, तर निशाद पक्षाला १५ जागा दिल्या जातील. गेल्या वेळी भाजपने ३८४ जागा लढविल्या होत्या. त्या वेळी अपना दल, सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आघाडीत होता. पूर्व उत्तर प्रदेशाबाबत भाजपला चिंता आहे. या भागातील इतर मागासवर्गीय समाजातील काही प्रमुख नेत्यांनी पक्ष सोडल्याने भाजपला चिंता वाटत आहे. त्यात स्वामी प्रसाद मौर्य, दारासिंह चौहान या नेत्यांचा समावेश आहे.