बिजनौर : उत्तर प्रदेशातील आपले विरोधक चुकीच्या रीतीने शेतकरी नेते चौधरी चरणसिंह यांच्या वारशावर दावा सांगत असल्याचा आणि राज्यात सत्तेवर असताना त्यांनी ‘विकासाची गंगा’ रोखल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला.
सत्तेवर असताना विरोधकांनी त्यांच्या क्षेत्रातील खेडय़ांना किती वीज दिली असा प्रश्न तुमची ‘दिशाभूल’ करणाऱ्यांना विचारा, असे आवाहन मोदी यांनी पश्चम उत्तर प्रदेशातील बिजनौर, मुरादाबाद व अमहोरा या जिल्ह्यांतील निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना शेतकऱ्यांना केले.
प्रत्यक्ष व आभासी अशा पहिल्या संमिश्र प्रचारसभेला मोदी संबोधित करणार होते, मात्र खराब वातावरणामुळे ते बिजनौरला भेट देऊ शकले नाहीत आणि अखेर त्यांनी तेथील सभेत दूरदृश्यसंवादाद्वारे भाषण केले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बिजनौरच्या सभेत स्वत: उपस्थित होते व त्यांनी सभेला संबोधित केले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात समाजवादी पक्ष व राष्ट्रीय लोक दल हे ‘शेतकऱ्यांचे पंतप्रधान’ चौधरी चरणसिंह यांच्या वारशावर दावा करत आहेत. रालोदचे नेतृत्व सध्या चरणसिंह यांचे नातू जयंत चौधरी करत आहेत.
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार हे शेतकरी बांधवांची प्रतिष्ठा आणि अधिकार परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या ५ वर्षांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १.५ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. यापूर्वीच्या दोन सरकारांनी मिळूनही एवढी रक्कम दिली नव्हती, असे पंतप्रदान म्हणाले. यापूर्वीच्या सरकारांनी ज्या दरात गहू खरेदी केला होता, त्यापेक्षा दुपटीहून अधिक दराने योगी आदित्यनाथ सरकारने किमान हमीभावात तो खरेदी केला आहे, असेही त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.