बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल. मात्र प्रत्यक्षात निकाल काय लागणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. अखिलेश यादव की योगी आदित्यनाथ कोण पुन्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार यावर राजकीय विश्लेषक आणि सट्टेबाजांकडून दावे प्रतिदावे केले जात आहे. असं असतानाच राज्यातील बदायूमधून एक वेगळीच बातमी समोर आलीय. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल काय लागतात यावरुन एक एकर जमीनीची पैज लावण्यात आलीय. (उत्तर प्रदेश निवडणुकीचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदुस्तान की खबर या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील निवडणुकीमध्ये भाजपा आणि समाजवादी पक्षाचे समर्थक विजय सिंह आणि शेर अली यांच्यामध्ये एक अजब पैज लागलीय. या पैजेचे साक्षीदार संपूर्ण गाव आहे. विशेष म्हणजे ही पैज केवळ तोंडी नसून यासंदर्बात कागदपत्र, करारनामा तयार करण्यात आला असून त्यावर दोघांनाही आपल्या अंगठाचे ठसेही दिले आहेत. या कागदपत्रांचे फोटो सध्या उत्तर प्रदेशमध्ये चर्चेत असून ते सोशल मीडियावरही व्हायरल झालेत. काहींनी आपल्या पक्षाच्या समर्थनार्थ चक्क एक एकर जमीनीची पैज लावणाऱ्या या दोघांच कौतुक केलंय तर काहींनी राजकारण्यांना काहीही फरक पडत नसताना एवढी जमीन पैजेवर लावणं योग्य वाटलेलं नाही. मात्र या प्रकरणाची चर्चा जोरात आहे.

बदायूंमधील शेखूपूर विधानसभा मतदारसंघामधील ककराला नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या बिरियाडांडी गावामध्ये या दोन शेतकऱ्यांमध्ये राजकीय चर्चेदरम्यान वाद झाला. मात्र हा वाद एवढा वाढला की थेट पंचायत बोलवण्यात आली. विजय सिंह ने भाजपाची सरकार येणार असा दावा केला तर शेर अलीने सपाची सत्ता येणार असं म्हटलंय.

या वादानंतर गावातील प्रमुख लोकांनी पंचायतीच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जर भाजपा सरकार जिंकली तर शेअर अली त्याची एक एकर जमीन एका वर्षासाठी विजय सिंहला शेतीसाठी देणार. मात्र सपाची सत्ता आल्यास विजय सिंह त्याची एक एकर जमीन शेर अलीला एका वर्षांसाठी देईल. दोघांनी यावर सहमती दर्शवली. पण केवळ तोंडी शब्द न घेता या दोघांकडून तसं लिहून घेण्यात आलं. साक्षीदारांनीही यावर स्वाक्षऱ्या केल्या.

उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना सत्तास्थापनेसाठी म्हणजेच बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. 

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up election result 2022 4 bigha land on bet by farmers over who will win up election bjp or sp scsg