उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान अवघ्या काही दिवसांवर आलंय. १० फेब्रुवारी रोजी मतदानाचा पहिली फेरी फार पडणार आहे. त्यामुळेच आता राजकीय दृष्ट्या देशातील सर्वात महत्वाच्या राज्यांपैकी एक असणाऱ्या या राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून संपूर्ण ताकद लावली जातेय. याचदरम्यान अलीगढमध्ये काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा या पक्षाच्या उमेदवारांसाठी रोड शो करताना दिसत आहेत. रविवारी झालेल्या अशाच एका रोड शोदरम्यान प्रियंका यांच्या ताफ्यासमोर भाजपाचे कार्यकर्ते आले.
प्रियंका गांधींना पाहताच भाजपा कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाने घोषणाबाजी सुरु केली. तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते प्रियंका गांधी जिंदाबादच्या घोषणा देत होते. रस्त्याच्या एका बाजूला भाजपा कार्यकर्ते तर दुसरीकडे काँग्रेसचे असं चित्र दिसत होतं.
दोन्ही बाजूचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत असतानाच प्रियंका गांधींनी आपली गाडी थांबवून भाजपा कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना काँग्रेसचं युवा घोषणापत्र असणाऱ्या ‘भारती विधान’ची एक प्रत दिली. तसेच त्यांनी तुम्ही हे एकदा नक्की वाचा. त्यानंतर प्रियंका गांधींची गाडी पुढे सरकली आणि भाजपा कार्यकर्तेही आपल्या मार्गाने निघून गेले.
प्रियंका यांनी अलीगढमध्ये राजकीय वक्तव्यांचा समाचार घेतला. कोणी म्हणतंय आम्ही गर्मी काढू, कोणी म्हणतंय चरबी काढू. पण मी सांगू इच्छिते की आम्ही नोकऱ्यांची भरती काढू. आम्ही काम करत आहोत. तुम्ही सुद्धा त्यांनाच पाठिंबा द्या जे तुमच्या समस्या सोडवू शकतात, असं प्रियंका म्हणाल्या.
आम्ही उत्तर प्रदेशमध्ये संपूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहोत. ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच आमच्या पक्षाने ४०३ जागांवर लढण्याचा निर्णय घेतलाय. लोकांशी थेट संबंध असणारे मुद्दे आम्ही मांडतोय. आम्ही आमच्या संघटनेला सक्षम करण्यासाठी बरंच काम केलं आहे. मागील दोन वर्षांमध्ये प्रत्यक्ष मैदानात उतरुन काम करताना केवळ काँग्रेस पक्ष दिसलाय. आता जनता काँग्रेस सोबत आहे, असंही प्रियंका म्हणाल्यात.