भगव्या रंगावरून उत्तर प्रदेशचे राजकारणात तापले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल करताना, योगी आदित्यनाथ गंजाच्या रंगासारखे कपडे घालतात असे म्हटले होते. लोखंडाला गंज लागल्यावर त्याचा रंग काय असतो? ते म्हणाले होते की, इंजिन लोखंडाचे असते, पण आमचे मुख्यमंत्री त्याच रंगाचे कपडे घालतात, असे वक्तव्य डिंपल यादव यांनी केले होते. त्यावर गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर देत होय, मी भगवाधारी असल्याचे सांगत याचा मला अभिमान आहे, असे म्हटले आहे.
डिंपल यादव यांच्यावर उपरोधिक टीका करताना, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, लोखंडाच्या गंजाचा रंग भगव्या वस्त्राशी जोडणारे त्यांचे वक्तव्य म्हणजे सनातन संस्कृती, सृजन आणि संत परंपरेचा अपमान आहे. भाजपाच्या दुहेरी इंजिन सरकारला गंज चढला आहे आणि योगी आदित्यनाथ गंजाच्या रंगासारखे कपडे घालतात, असे डिंपल यादव म्हणाल्या होत्या.
“त्यांचे वक्तव्य म्हणजे सनातन संस्कृती, सृजन आणि संत परंपरेचा अपमान आहे. तसेच मी भगवी वस्त्रे घालत असल्याचा मला अभिमान आहे,” असे योगी आदित्यनाथ यांनी आपल्या सभेत म्हटले. यानंतर बराच वेळ जाहीर सभेत ‘मी भगवाधारी’, ‘आम्हीही भगवेधारी’ अशा घोषणा देण्यात येत होत्या.
“प्रत्येक गोरखपूर आणि राज्यातील नागरिकांनी अभिमानाने सांगायला हवे की, आम्हीही भगवी वस्त्रे पांघरलेले आहोत. भगवा रंग हा सृष्टीच्या ऊर्जेचा रंग आहे. हा देखील भगवान सूर्य आणि सूर्योदयाच्या किरणांचा रंग आहे. उर्जा देणाऱ्या अग्नीचा रंगही भगवा असतो.त्याचबरोबर जागतिक स्तरावरून अभिमानाने म्हणा आम्ही हिंदू आहोत, अशी घोषणा करणारे स्वामी विवेकानंदही भगवेच वस्त्र धारण करत होते. ही आपली ओळख आहे. भगव्या रंगावर टीका करणाऱ्या लोकांचे संस्कार त्यांच्या विधानांवरून कळतात,” असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
अलीकडेच प्रचारादरम्यान डिंपल यादव यांनी कौशांबीच्या सिरथू विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कपड्याच्या रंगाची तुलना लोखंडावरील गंजाशी केली होती. “इंजिन लोखंडाचे असते, पण त्यावर गंज चढतो त्याच रंगाचे कपडे मुख्यमंत्री घालतात. तसेच गंजलेल्या रंगाचे इंजिन काढणे आवश्यक आहे,” असे डिंमल यादव म्हणाल्या होत्या.