UP Vidhan Sabha Nivadnuk Phase 1 Voting News:उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. राज्याच्या पश्चिम भागाच्या ११ जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघात मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या ५८ मतदारसंघातील प्रचार बुधवारी थंडावला. मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली असून करोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक तत्त्वे राबवण्यात आली आहेत.

उत्तर प्रदेश सरकारमधील श्रीकांत शर्मा, सुरेश राणा, संदीप सिंह, कपिलदेव अगरवाल, अतुल गर्ग आणि चौधरी लक्ष्मी नारायण हे मंत्री पहिल्या टप्प्यात प्रमुख उमेदवार आहेत. या ५८ मतदारसंघात एकूण ६२३ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत असून दोन कोटी २७ लाख मतदार आहेत. जाट मतदारांचा प्राबल्य असलेल्या या भागांत मतदान होणार असून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना या भागांतील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे यंदा भाजपला या मतदारसंघात कसा प्रतिसाद मिळतोय याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

Live Updates

Uttar Pradesh Assembly Elections 2022 Phase 1 Voting : जाट मतदारांचा प्राबल्य असलेल्या या भागांत मतदान होणार असून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना या भागांतील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता.

18:07 (IST) 10 Feb 2022
५ वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात ५५.७९ टक्के मतदान

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात आज पाच वाजेपर्यंत ५५.७९ टक्के मतदान झालं आहे. ६२३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून या टप्प्यात मतदानासाठी पात्र असलेल्यांची संख्या २ कोटींच्या आसपास आहे.

17:05 (IST) 10 Feb 2022
काँग्रेसने बिपिन रावतांना जिवंतपणी शिवीगाळ केली आणि आता त्यांच्याच नावावर मतं मागतायत - पंतप्रधान मोदी

काँग्रेसने जनरल बिपिन रावत जिवंत असताना त्यांना शिवीगाळ केली आणि आता ते गेल्यावर त्यांच्या कट-आऊटचा वापर मतं मिळवण्यासाठी केला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तराखंडच्या श्रीनगरमध्ये एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, त्याच काँग्रेसने पाकिस्तानमधील दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितला होता. पक्षाच्या एका नेत्याने माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल रावत यांना "रस्त्यावरील गुंड" म्हटले होते. काँग्रेसला सत्तेसाठी एकहाती प्रयत्न करणारा पक्ष असून ते बलिदानाची किंमत कधीच समजू शकत नाहीत.

16:19 (IST) 10 Feb 2022
मला पंतप्रधानांच्या ईडी, सीबीआयची भीती वाटत नाही - राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या तपास यंत्रणांची आपल्याला भीती वाटत नसल्याचं राहुल गांधी यांनी आज हरिद्वार मधल्या मंगलौर इथं झालेल्या सभेत सांगितलं. उत्तराखंडमध्ये भाजपाने आपला मुख्यमंत्री बदलला आणि एका चोराच्या जागी दुसरा चोर उभा केला, असंही राहुल गांधी म्हणाले. मोदींच्या एका मुलाखतीचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधानांचं असं म्हणणं आहे की मी त्यांचं ऐकत नाही. त्यांचं बरोबर आहे. मी त्यांचं ऐकत नाही कारण मला त्यांची किंवा त्यांच्या ईडी, सीबीआयची भीती वाटत नाही.

15:34 (IST) 10 Feb 2022
प्रियंका गांधींनी मोटार मेकॅनिकला समजावून सांगितला पक्षाचा जाहीरनामा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी प्रचारादरम्यान रामपूरमधल्या एक मोटार मेकॅनिकला त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा शेजारी बसून समजावून सांगितला.

15:25 (IST) 10 Feb 2022
कुठे वीजपुरवठा खंडित, कुठे ईव्हीएममध्ये बिघाड...शासनाच्या निष्काळजीपणामुळे मतदार संतप्त

बागपत येथील एका मतदान केंद्रावर मतदान सुरू होताच वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे मतदान कर्मचार्‍यांना मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने मतदान करण्याची सक्ती केली जात आहे. अंधारामुळे मतदान संथ गतीने सुरू आहे. दुसरीकडे, मुझफ्फरनगरमधील एका केंद्रात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सकाळी ७ वाजल्यापासून रांगेत उभे असल्याचे लोकांचे म्हणणे आहे, मात्र ईव्हीएम बिघाडामुळे मतदान सुरू होऊ शकले नाही.

15:01 (IST) 10 Feb 2022
घरोघरी जाऊन भांडी विक्रेता विरुद्ध राज्याचे उपमुख्यमंत्री; यंदाची रंगतदार लढत

एक भांडी विक्रेता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या विरोधात यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी छेदू चमर यांनी कौशांबी जिल्ह्यातील सिरथू विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. मौर्य याच जागेवरून निवडणूक लढवत आहेत.

चमर यांनी यापूर्वी दोन संसदीय तसेच दोन उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत. कौशांबी जिल्ह्यातील तैबापूर शमशाबाद गावात राहणारे चमर, घरोघरी भांडी विकून उदरनिर्वाह करतात. गेल्या २२ वर्षांच्या त्यांच्या 'राजकीय प्रवासात', चमर यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुका तसेच २०१२ आणि २०१७ च्या यूपी विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत. जिल्हा पंचायतीच्या निवडणुकाही त्यांनी तीनदा लढवल्या आहेत.

14:10 (IST) 10 Feb 2022
१ वाजेपर्यंत ३५.०३ टक्के मतदान

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३५.०३ टक्के मतदान झालं आहे.

13:19 (IST) 10 Feb 2022
राज्याला दंगलमुक्त ठेवणाऱ्यांनाच जनता मतदान करणार आहे - पंतप्रधान मोदी

पश्चिम यूपीमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असताना, सहारनपूरमध्ये प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जनतेने उत्तर प्रदेशचा विकास करणाऱ्यांना मत द्यायचे ठरवले आहे. जे उत्तर प्रदेशला दंगलमुक्त ठेवतात, जे आमच्या माता-भगिनींना भयमुक्त ठेवतात, जे गुन्हेगारांना तुरुंगात ठेवतात, लोक त्यांनाच मतदान करतील. सर्वच परिवारवादी पक्ष खोटी आश्वासने देत आहेत. त्यांनी विजेचे आश्वासन दिले होते पण संपूर्ण उत्तर प्रदेशला अंधारात ठेवले होते.”

12:34 (IST) 10 Feb 2022
अलीगडच्या खैर विधानसभा मतदारसंघातील धुमरा गावात ईव्हीएममध्ये बिघाड

अलीगढमधील खैर विधानसभा मतदारसंघातील धुमरा गावात ईव्हीएम बिघाडामुळे बराच काळ मतदान रखडले आहे. आज सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळातच अनेक जिल्ह्यांतून ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. या तक्रारी मेरठ, मुझफ्फरनगर, अलीगढ, बागपत आदी जिल्ह्यांत जास्त होत्या.

12:33 (IST) 10 Feb 2022
"आधी मतदान, मग सगळी कामं"

मुजफ्फरगनरच्या एका मतदान केंद्रावर आज आपल्या विवाहाच्या अगोदर मतदान करण्यासाठी आलेला नवरदेव अंकुर बाल्यान यांने म्हटले की, "आधी मतदान, त्यानंतर सून, त्यानंतर सर्व काम"

12:11 (IST) 10 Feb 2022
पहिल्या टप्प्यातील मतदानात 'जाट' फॅक्टरची महत्वाची भूमिका

पहिल्या टप्प्यातील मतदानात जाट घटक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के जाट मतदार आहेत. मथुरा, बागपत, मुझफ्फरनगर, मेरठ हे जाटबहुल जिल्हे आहेत. तर गाझियाबाद, अमरोहा, सहारनपूर, बिजनौर, हापूर, आग्रा आणि हाथरस जिल्ह्यातही जाट मतदारांची संख्या लक्षणीय आहे.

12:08 (IST) 10 Feb 2022
प्रियंका गांधी यांचे मतदारांना आवाहन आणि उमेदवारांना शुभेच्छा, म्हणाल्या...

''पश्चिम उत्तर प्रदेशातील माझ्या प्रिय भगिनींनो आणि बंधूंनो, तुमच्या प्रश्नांसाठी आणि राज्याचे चांगले भविष्य घडवण्यासाठी मताची ताकद वापरा. माझ्या सर्व सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि उत्तर प्रदेश काँग्रेसच्या उमेदवारांना शुभेच्छा - तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की ३० वर्षांनंतर आपण सर्व जागांवर आपल्या ताकदीने लढत आहोत''. असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

11:56 (IST) 10 Feb 2022
नव्या उत्तर प्रदेशाचा नवा नारा... अखिलेश यादव यांचं ट्वीट चर्चेत

विधानसभा जागांसाठी उत्तर प्रदेशात मतदान सुरू असतानाच समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एक ट्वीट केलं आहे. नव्या उत्तर प्रदेशाचा नवा नारा, विकास हीच असेल विचारधारा असं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

11:54 (IST) 10 Feb 2022
११ वाजेपर्यंत २० टक्के मतदान

उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत २० टक्के मतदान झालं आहे. ६२३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून या टप्प्यात मतदानासाठी पात्र असलेल्यांची संख्या २ कोटींच्या आसपास आहे.

11:51 (IST) 10 Feb 2022
सम्राट मिहिर भोज यांच्या पुतळ्यावरून 'या' गावात नाराजी; काय आहे या जागेचं समीकरण?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दादरी मतदारसंघात गुज्जर समाजात नाराजी पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी २२ सप्टेंबरला योगी सरकारने या गावात गुर्जर सम्राट मिहिर भोज यांचा पुतळा बसवला होता. या दरम्यान सुरुवातीच्या फलकात 'गुर्जर' हा शब्द नव्हता. अशा परिस्थितीत गुजर समाजाच्यावतीने निषेध करण्यात आला. मात्र, लोकांच्या विरोधामुळे राज्य सरकारने नंतर त्यात सुधारणा केली.

दादरी मतदारसंघातील कोणत्याही पक्षाला गुज्जर समाजाने आपल्यावर नाराज व्हावे असे वाटत नाही. प्रत्यक्षात या मतदारसंघातील एकूण ६ लाख मतदारांपैकी सुमारे २ लाख गुजर मतदार आहेत. २००७ आणि २०१२ मध्ये बसपाने ही जागा जिंकली होती. त्याचवेळी २०१७ मध्ये मोदी लाटेत भाजपने ८० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.

10:59 (IST) 10 Feb 2022
"आधी मतदान, मग अल्पोपहार..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मतदारांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यास सांगितले. “उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा आज पहिला टप्पा आहे. मी सर्व मतदारांना विनंती करतो की, कोविड-१९ नियमांचे पालन करून लोकशाहीच्या या पवित्र सणात उत्साहाने सहभागी व्हावे. लक्षात ठेवा - आधी मतदान करा, मग अल्पोपहार!” , असं ट्वीट मोदी यांनी केलं आहे.

10:49 (IST) 10 Feb 2022
मतदारांना घाबरवलं जात आहे; समाजवादी पक्षाचा आरोप

समाजवादी पक्षाने एका ट्विटद्वारे आरोप केला आहे की, विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना गरीब वर्गातील मतदारांना घाबरवले जात आहे आणि यूपीच्या शामली जिल्ह्यातील कैराना येथील मतदान केंद्रापासून दूर पाठवले जात आहे.

10:45 (IST) 10 Feb 2022
शेतकरी आंदोलन आणि भाजपापुढील आव्हाने

शेतकरी आंदोलन आणि उसाचा दर हे या टप्प्यातील मुख्य मुद्दे. शेतकरी कायदे केंद्र सरकारने मागे घेतले असले तरी या कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर झालेल्या आंदोलनाचा पश्चिम उत्तर प्रदेश हा केंद्रबिंदू होता. शेतकरी आंदोलनाची झळ या परिसरात अधिक होती. शेतकरी आंदोलनात शीख आणि जाट समाज मोठ्या प्रमाणावर उतरला होता. उद्या मतदान होत असलेल्या परिसरात जाट समाजाचा अधिक प्रभाव आहे. जाट समाजाच्या नाराजीचा भाजपाला फटका बसू शकतो. हा धोका ओळखूनच भाजपाने गेले काही महिने या परिसरावर लक्ष केंद्रित करीत जाट समाजाला आपलेसे करण्यावर भर दिला. विशेषतः उसाला वाढीव दर तसेच शिल्लक रक्कमेचे वाटप करण्यात आले. शेतकरी नाराज राहू नये म्हणून उत्तर प्रदेश सरकारने खबरदारी घेतली आहे.

10:41 (IST) 10 Feb 2022
"देशाला भयमुक्त करा..."; राहुल गांधींचं मतदारांना आवाहन

उत्तर प्रदेशातल्या ११ जिल्ह्यांमध्ये मतदानाला सुरूवात होताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. देशाला भयमुक्त करा, मतदान करा, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दिल्लीला जोडून असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशातील ११ जिल्ह्यांमध्ये हे मतदारसंघ पसरलेले आहेत. जाट, मुस्लीम, गुज्जर या समाजांचा प्रभाव असलेल्या या परिसरात शेतकरी आंदोलन, उसाचा दर यामुळे भाजपपुढे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत या ५८ मतदारसंघांपैकी ५३ जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने प्रत्येकी दोन जागा मिळवल्या, तर एका जागेवर राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवाराचा विजय झाला होता.साहजिकच भाजपपुढे वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान असेल.

पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील ११ जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. पश्चिम उत्तर प्रदेश हा राजधानी दिल्लीला जोडून असलेला भाग. गौतम बुद्ध नगर, मेरठ, मुझफ्फरनगर, बागपत, गाझियाबाद, बुलंदशहर, अलिगढ, आग्रा, मथुरा, हापूर या जिल्ह्यांमधील हे मतदारसंघ आहेत. जाट समाजाचे या भागात प्राबल्य. ऊस हे या भागातील मुख्य पीक. देशात सर्वाधिक ऊस उत्पादन उत्तर प्रदेशात होते व त्यातही पश्चिम उत्तर प्रदेशचा मोठा वाटा आहे.

Story img Loader