उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यंदाची निवडणूक ही “८० विरुद्ध २०” ची असेल, असं विधान केलेलं आहे. तर, त्यांचं हे विधान उत्तर प्रदेशातील हिंदू आणि मुस्लिमांच्या प्रमाणाशी जुळत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.
नवाब मलिक म्हणाले आहेत की, “ज्या पद्धतीने योगींनी ८० विरुद्ध २० टक्क्यांवरून विधान केलं आहे की, जे लोक राम मंदिराचा विरोध करत आहेत. त्यांच्याशी सामना हा ८० टक्के लोकांचा आहे. त्यांनी थेट मुस्लिमांविरोधात हे विधान केलेलं आहे. योगीजी तुम्ही इतिहास तपासून पाहावा, राम मंदिर-बाबरी मशीद विवादापासून सर्व मुस्लीम संघटना असतील, मुस्लीम असतील एकच सांगत होते की न्यायालयाचा जो निर्णय येईल आम्ही तो मान्य करू. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक नेहमीच सांगत आले आहेत की आम्ही न्यायालयाचा निर्णय मान्य करणार नाही. आम्हाला वाटतं की जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय केला, देशाने स्वीकारला. कोणीच त्याचा विरोध करत नाही. मंदिर निर्माणाचं काम सुरू आहे आणि तरीही तुम्ही मंदिरावरून वादग्रस्त वक्तव्य करत आहात. आपल्या कामांवर तुम्हाला विश्वास नाही का? तुमचं सरकार रामभरोसे झालं आहे का?”
तसेच, “आम्हाला वाटतं की ज्या प्रकारचं विधान योगी करत आहेत, हे स्पष्ट होत आहे की भाजपा उत्तरप्रदेशमध्ये पराभूत होत आहे. लोकामध्ये त्यांच्या विरोधात असलेला राग आणि नाराजी हे योगीजींच्या पराभवाचे मुख्य कारण बनणार आहे. तुम्ही धर्माच्या आड कितीही लपून बसला, तरीही तुमचा पराभव होईल.” असे देखील नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
UP Elections: या ८० विरुद्ध २० टक्क्यांच्या लढाईत ब्राह्मण करणार नेतृत्वः योगी आदित्यनाथ
राजधानी लखनऊमध्ये एका खाजगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ब्राह्मण मतांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “निवडणूक यापेक्षा खूप पुढे गेली आहे. आता ही निवडणूक ८० विरुद्ध २० अशी आहे.” त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणाले की, ओवेसी यांनी ते ९० टक्के असल्याचे सांगितले आहे. योगी आदित्यनाथ यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं, “लढा आता ८० आणि २० आहे, जे सुशासन आणि विकासाचे समर्थन करतात, ८० टक्के भाजपसोबत आहेत आणि जे शेतकरी विरोधी आहेत, विकासविरोधी आहेत, गुंडांना, माफियांना पाठिंबा देतात. ते २० टक्के विरोधकांसोबत आहेत”.
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी, उत्तर प्रदेशच्या ४०३ जागांच्या विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार असल्याचे सांगितले आहे. उत्तर प्रदेशमध्ये १०, १४ , २०, २३ , २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि सात मार्चला मतदान होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. करोनामुळे निवडणुकीसाठी नवीन प्रोटोकॉल करण्यात आला आहे. कोविडमुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.