उत्तर प्रदेशात सिरथू विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य समाजवादी पक्षाच्या उमेदवार पल्लवी पटेल यांच्याकडून पराभूत झाले. सपाच्या पल्लवी पटेल यांनी केशव प्रसाद मौर्य यांचा ७३३७ मतांनी पराभव केला आहे. पल्लवी यांना १०५५६८ मते मिळाली आहेत. तर केशव प्रसाद यांना ९८७२७ मतांवर समाधान मानावे लागले आहे. तिसऱ्या क्रमांकावर बसपचे मुनसाब अली यांना १००३४ मते मिळाली आहे. वडिलांना हरताना पाहून केशव यांच्या मुलाने आणि भाजपा समर्थकांनी मतमोजणी थांबवली होती. त्यांच्या वतीने पुन्हा मतदान घेण्याची मागणी करण्यात आली. मात्र, यावर निरीक्षकांनी मतांची फेरमोजणी करण्यास नकार दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सिरथू विधानसभा मतदार संघातील जनतेचा निर्णय मला नम्रपणे मान्य आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीबद्दल मी कृतज्ञ आहे. ज्या मतदारांनी मतांच्या रूपाने आशीर्वाद दिला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो,” असे मौर्य यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सपाच्या उमेदवार पल्लवी पटेल यांनीही मतमोजणी बंद झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून मतमोजणी सुरु करण्याचा इशारा दिला. पुन्हा मतदान झाले तर ते योग्य होणार नाही, असे पटेल यांनी म्हटले होते. मतमोजणी थांबण्यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांना ८४९६१ मते मिळाली, तर सपाच्या पल्लवी यांना ८५८८६ मते मिळाली. ३१ फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर केशव प्रसाद मौर्य सपा उमेदवारापेक्षा खूप मागे पडले आणि निवडणूक हरले.

२०१४ मध्ये सपा विजयी

२०१४ च्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाला सिरथूची जागा जिंकता आली होती. फुलपूरमधून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर केशव प्रसाद मौर्य यांनी सिरथूच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ही पोटनिवडणूक झाली. १९९३ ते २००७ पर्यंत सिरथू जागा अनुसूचित जातीसाठी राखीव होती. त्यावेळी या जागेवरून बसपचेच उमेदवार विजयी झाले होते. केशव प्रसाद मौर्य हे भाजपच्या तिकिटावर २०१२ साली सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आल्यावर विजयी झाले आणि त्यांनी पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला.

या भागात सुमारे ३४ टक्के मागासवर्गीय मतदार असल्याचे सांगण्यात येते. एकूण ३,८०,८३९ मतदार आहेत. त्यापैकी १९ टक्के मतदार हे सर्वसाधारण गटातील आहेत. या भागात सुमारे ३३ टक्के दलित आणि १३ टक्के मुस्लिम मतदार असल्याचे सांगितले जाते.

२०१२ मध्ये पहिल्यांदा भाजपाने जिंकली होती सिरथूची जागा

२०१२ च्या विधानसभा निवडणुकीत प्रयागराज, प्रतापगड आणि कौशांबी येथील २२ जागांपैकी सिरथू ही एकमेव जागा होती. जिथून भाजपाने विजय मिळवला होता. या जागेवर भाजपाचा हा पहिला विजय ठरला. मागील दोन निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. अतिक अहमद २००४ मध्ये फुलपूरमधून खासदार झाल्यानंतर, अलाहाबाद शहर पश्चिम जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत आणि त्याच जागेवर २००७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर दोन वर्षांनी झालेल्या २०१४ लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना फुलपूरमधून उमेदवारी दिली. ज्यात त्यांनी फुलपूरच्या जागेवर तीन लाखांहून अधिक मतांनी विक्रमी विजय मिळवून पहिल्यांदाच भाजपाचे कमळ फुलवले होते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh election result 202 big blow to bjp deputy cm keshav prasad maurya lost the election from sirathu abn