शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपावर निशाणा साधला. जिवंत माणसं त्यांना मतदान करणार नाहीत. मग करोना काळात गंगेत वाहून गेलेले मृतदेह त्यांना मतदान करणार आहेत का? असा प्रश्न संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, यावेळ त्यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांच्याबाबत देखील टिप्पणी केली.
माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “करोना काळात गंगेत जे मृतदेह वाहून गेले ते येऊन त्यांना मत देणार आहेत का? जिवंत माणसं तर त्यांना मतदान करणार नाहीत. कधीच नाही करणार. अखिलेश यादव यांनी देखील आपले संपूर्ण लक्ष निवडणुकीवर केंद्रीत केले पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन लढाई लढली पाहिजे. अहंकार सर्वांनाच बुडवतो, हे आपल्या समोर उदाहरण आहे. लोक फार मोठ्या अपेक्षेने अखिलेश यांच्याकडे पाहत आहेत. आम्ही देखील निवडणूक लढवत आहोत, आम्ही निवडणूक लढवू परंतु परिवर्तनाची ताकद जी आहे ती काँग्रेस, अखिलेश आणि जे कोणी भाजपाविरोधातील पक्ष असतील त्यांना मिळूनच लढावे लागेल.”
तसेच, “मोदींनी कुंभ स्नान केलं आणि नंतर दलितांना सोबत घेऊन त्यांचे पाय धुतले होते. आता भाजपाची लोक दलितांच्या घरोघरी जात आहेत. मात्र तुमच्या मनातून जात कधी जाणार? माणूस आहे त्याची जात नसते, असं मी मानतो. परंतु तुम्ही दलितास दलित तर मुस्लीमास मुस्लीम बनवतात. दलित म्हणून त्यांच्या घरी जेवण करतात. तुम्ही एखाद्याच्या घरी जाऊन जेवत आहात, तुम्ही एखादी जात किंवा व्यक्तीच्या घरात जाऊन नाही जेवण करत आहात हे संपूर्ण ढोंग आहे, राजकारण आहे. मतपेटीचं राजकारण तुम्ही करू इच्छित आहात. असं करू नका देश पुन्हा एकदा जातीप्रथेवरून विभाजित होईल.” असंही यावेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.
म्हणून भाजपाला उत्पल पर्रिकरांचा विचार करावा लागतोय –
“ मनोहर पर्रिकर हे गोव्याचे प्रमुख नेते होते, गोव्याच्या विकासात त्यांचं नक्कीच योगदान होतं. परंतु त्यांच्या मृत्यू नंतर भाजपाने ज्या पद्धतीने त्यांच्या कुटुंबाशी एकप्रकारे वैर घेतलेलं आहे, ते काय कोणाच्या मनाला पटत नाही. जरी आम्ही वेगळ्या राजकीय पक्षाचे असू, भाजपा विरोधात लढत असलो तरी देखील उत्पल पर्रिकरांचा ज्या प्रकारे अपमान केला जात आहे. पर्रिकरांच्या कुटुंबाबद्दल अशाप्रकारे जे बोलताय त्यांची लायकी काय असं जर आम्ही विचारलं तर?, मला खात्री आहे उत्पल पर्रिकरांना त्यांना उमेदवारी द्यावी लागेल. आम्ही सगळेच जण त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे म्हणून भाजपाला उत्पल पर्रिकरांचा विचार करावा लागतो आहे, तो दिल्लीत केला जातोय. जर उत्पल पर्रिकर अपक्ष लढणार असतील तर सर्वच राजकीय पक्षांनी मतभेद विसरून उत्पल पर्रिकरांच्या मागे ठामपणे उभा रहावं, अशी आमची भूमिका आहे. ” असं संजय राऊत यावेळी उत्पल पर्रिकर यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं.