देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. आता दुसरा टप्पाही लवकरच पार पडणार असून दुसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. असे असतानाच उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील भाजपाचे उमेदवार विश्वदीप सिंह चांगलेच चर्चेत आले आहेत. विश्वदीप सिंह यांच्या वयाच्या वादावरुन उत्तर प्रदेशमध्ये चांगलंच राजकारण तापलं आहे.
विश्वदीप सिंह यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर त्यांच्या वयाचा घोळ समोर आला आहे. विश्वदीप सिंह यांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे वय ६० असल्याचे नमूद केले होते. मात्र, यानंतर आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विश्वदीप सिंह यांनी त्यांचे वय ७५ वर्ष नमूद केले आहे. त्यामुळे २०१४ ची निवडणूक ते २०२४ ची निवडणूक यामध्ये १० वर्षांचे अंतर असताना विश्वदीप सिंह यांचे वय १५ वर्षांनी कसे वाढले? यासंदर्भात समाजवादी पार्टीने प्रश्न उपस्थित केले आहेत.
quiziframe id=30 dheight=282px mheight=417px
हेही वाचा : “८० टक्के हिंदूंना १४ टक्के मुस्लिमांकडून धोका कसला?”, मोदींच्या वक्तव्यावर ओमर अब्दुल्लांचा उद्विग्न सवाल
विश्वदीप सिंह यांनी २०१४ च्या लोकसभेला बहुजन समाज पार्टीकडून निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीतही त्यांना विजय मिळवता आला नव्हता. यानंतर आता पुन्हा एकदा विश्वदीप सिंह निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. विश्वदीप सिंह यांच्या विरोधात आता समाजवादी पार्टीने अक्षय यादव यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, फिरोजाबादमधून विश्वदीप सिंह आणि समाजवादी पार्टीचे अक्षय यादव यांच्यात कांटे की टक्कर होण्याचे चित्र आहे. मात्र, अशातच विश्वदीप सिंह यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या त्यांच्या वयावरुन समाजवादी पार्टी आणि भाजपा यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहे. तसेच विश्वदीप सिंह यांच्या वयासंदर्भात समाजवादी पार्टीने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, असे सांगितले जात आहे. पण समाजवादी पार्टीची तक्रार निवडणूक आयोगाने फेटाळून लावली असल्याची माहिती समोर येत आहे.