Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी चालू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार अनेक राज्यांमधून धक्कादायक निकाल समोर येऊ लागले आहेत. उत्तर प्रदेश हे त्यापैकी एक राज्य आहे. देशात सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ (८०) असलेल्या या राज्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. ५४३ पैकी ८० खासदार एकट्या उत्तर प्रदेशमधून येतात. त्यातही बहुमताचं संख्याबळ २७२ इतकं आहे. त्यामुळे देशात सत्तास्थापनेसाठी उत्तर प्रदेशला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं. त्याचबरोबर देशाच्या आजवरच्या इतिहासात उत्तर प्रदेशने सर्वाधिक पंतप्रधान दिले आहेत. त्यामुळेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी वडोदरा आणि वाराणसीमधून निवडणूक लढवली होती. या दोन्ही मतदारसंघात विजयी झाल्यानंतर मोदींनी उत्तर प्रदेशसाठी वडोदरा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला होता.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये यंदादेखील भाजपाचं वर्चस्व असेल असा दावा अनेक एक्झिट पोल्समध्ये करण्यात आला होता. हे राज्य गेल्या १० वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ७१ जागा जिंकल्या होत्या. तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने ६२ जागा जिंकल्या होत्या. यावर्षी भाजपाला ६० ते ७५ जागा मिळतील असे अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले आहेत. मात्र आतापर्यंत हाती आलेले निकाल हे एक्झिट पोलमधील अंदाजापेक्षा वेगळे आहेत.

रात्री साडेदहा वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार समाजवादी पार्टीने राज्यातील ३५ जागा जिंकल्या आहेत. भाजपाने ३३, काँग्रेसने ६, राष्ट्रीय लोक दलाने २, आझाद समाज पार्टीने १ जागा जिंकली आहे. तर दोन जागांवर अद्याप मतमोजणी चालू आहे. या दोन मतदारसंघांमध्ये समाजवादी पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

Live Updates

2024 UP Lok Sabha Election Result 2024 Updates : उत्तर प्रदेशमधील लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स एकाच क्लिकवर.

22:40 (IST) 4 Jun 2024
2024 UP Lok Sabha Election Result 2024 : उत्तर प्रदेशात अखिलेश यादवांचं पुनरगामन, भाजपाने निम्म्या जागा गमावल्या

रात्री साडेदहा वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार समाजवादी पार्टीने राज्यातील ३५ जागा जिंकल्या आहेत. भाजपाने ३३, काँग्रेसने ६, राष्ट्रीय लोक दलाने २, आझाद समाज पार्टीने १ जागा जिंकली आहे. तर दोन जागांवर अद्याप मतमोजणी चालू आहे. या दोन मतदारसंघांमध्ये समाजवादी पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

21:16 (IST) 4 Jun 2024
मेरठमध्ये ‘राम’, नगीना मतदारसंघात ‘रावण’ विजयी, भाजपाने अर्ध्याहून अधिक जागा गमावल्या

रामायण या टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेत रामाची भूमिका करून लोकप्रिय झालेले अभिनेते अरुण गोवील (भाजपा उमेदवार) हे मेरठ लोकसभेतून निवडून आले आहेत. तर नगीना लोकसभा मतदारसंघात आझाद समाज पार्टीचे (कांशी राम) उमेदवार चंद्रशेखर आझाद रावण (भीम आर्मी संघटनेचे प्रमुख) हे ५,११,२५२ मतांसह विजयी झाले आहेत. रावण यांनी भाजपाच्या ओम कुमार (३,६१,३८०) यांचा १,५१,४७३ मतांनी पराभव केला आहे.

19:44 (IST) 4 Jun 2024
भाजपाची ३२ जागांवर आघाडी, सपा-काँग्रेसची मुसंडी

सायंकाळी पावणेआठ वाजेपर्यंत राज्यात समाजवादी पार्टीने ३८ तर भाजपाने ३२ जागांवर आघाडी मिळवली आहे. तसेच काँग्रेसला ६ जागांवर आघाडी मिळाली आहे.

18:39 (IST) 4 Jun 2024
मेरठ मतदारसंघातून अरुण गोवील विजयी

रामायण या टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेत रामाची भूमिका करून लोकप्रिय झालेले अभिनेते अरुण गोवील (भाजपा उमेदवार) हे मेरठ लोकसभेतून निवडून आले आहेत.

17:29 (IST) 4 Jun 2024
सुपस्टार निरहुआ पराभूत

उत्तर प्रदेशात भाजपाला धक्का बसला आहे. केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडेय पराभूत झाले आहेत. आजमगडचे उमेदवार आणि भोजपुरी सुपरस्टार निरहुआ यांचाही पराभव झाला आहे. सपा नेते धर्मेंद्र यादव यांनी निरहुआचा पराभव केला आहे.

15:56 (IST) 4 Jun 2024
UP Election Result : बसपा सर्व ८० जागांवर पिछाडीवर

बहुजन समाज पार्टीने (बसपा) उत्तर प्रदेशमधील सर्व ८० जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांचे सर्व उमेदवार पिछाडीवर आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अहवालानुसार दुपारी ३ वाजेपर्यंत बसपाला देशात केवळ १.९२ टक्के मतं मिळाली आहेत. तर उत्तर प्रदेशात ९.१६ टक्के मतं मिळाली आहे. मात्र बसपाचा एकही उमेदवार आघाडी मिळवू शकलेला नाही.

13:55 (IST) 4 Jun 2024
फिरोजाबादमध्ये सपा उमेदवार आघाडीवर

फिरोजाबाद मतदारसंघात समाजवादी पार्टीचे अक्षय यादव हे ६२ हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपा उमेदवार विश्वदीप सिंह यांना २,०४,६६७ तर अक्षय यादव यांना २,६७,३१८ मतं मिळाली आहेत.

13:45 (IST) 4 Jun 2024
राहुल गांधींची रायबरेलीतली आघाडी मोदींच्या वाराणसीतील आघाडीपेक्षा दुप्पट

राहुल गांधी रायबरेली मतदारसंघात २.२५ लाख मतांनी आघाडीवर आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी मतदारसंघात अवघ्या एक लाख मतांची आघाडी मिळाली आहे.

13:19 (IST) 4 Jun 2024
मुंबईत ठाकरे गटाचे सर्व शिलेदार आघाडीवर, शिंदे गटाला कडवी लढत

मुंबईत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सर्व (४) शिलेदार आघाडीवर आहेत. तर शिंदे गट संघर्ष करताना दिसत आहे. उरलेल्या दोन मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

सविस्तर वाचा

13:13 (IST) 4 Jun 2024
कृपाशंकर सिंह पिछाडीवर

उत्तर प्रदेशच्या जौनपूर मतदारसंघात भाजपा उमेदवार कृपाशंकर सिंह पिछाडीवर असून समाजवादी पार्टीचे बाबू कुशवाह यांनी ५ हजार मतांनी आघाडी मिळवली आहे.

12:24 (IST) 4 Jun 2024
Ayodhya Lok Sabha Result : फैजाबादच्या जागेवर मोठा उलटफेर

अयोध्या हे शहर फैजाबाद लोकसभा मतदारसंघात येतं. हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात होता. मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार हा मतदारसंघ भाजपाच्या हातून निसटतोय असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या मतदरसंघात समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद हे १० हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपा उमेदवार लल्लू सिंह यांना २,३९,६६७ तर अक्षया यादव यांना २,२९,३१८ मतं मिळाली आहेत.

11:43 (IST) 4 Jun 2024
Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024 Live : आठ जागांवर काँग्रेस आघाडीवर

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे दोन खासदार निवडून आले होते. तर, २०१९ च्या निवडणुकीत या राज्यात काँग्रेसचा केवळ एकच खासदार निवडून आला होता. सकाळी ११ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार या राज्यात आठ जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.

11:38 (IST) 4 Jun 2024
Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024 Live : रायबरेलीत राहुल गांधींना मोठी आघाडी

रायबरेलीत राहुल गांधी यांना १.८९ लाख मतं मिळाली आहेत. तर त्यांच्याविरोधात उभे असलेले भाजपा उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांना ९० हजार मतं मिळाली आहेत.

11:33 (IST) 4 Jun 2024
Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024 Live : उत्तर प्रदेश भाजपाच्या हातून निसटलं?

उत्तर प्रदेशमधील ३५ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधींचा पराभव करून जायंट किलर ठरलेल्या खासदार स्मृती ईराणी यांच्या चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. या मतदारसंघात स्मृती ईराणी तब्बल ३३ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा यांना १ लाख ४ हजार मतं मिळाली आहेत.

11:30 (IST) 4 Jun 2024
Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024 Live : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीचं दमदार पुनरागमन

२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या समजावादी पार्टीचे केवळ ५-५ खासदार निवडून आले होते. मात्र यावेळी समाजवादी पार्टीने दमदार पुनरागमन केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत हाती आलेल्या निवडणुकीच्या निकालांनुसार राज्यात ३४ जागांवर समाजवादी पार्टीच्या उमेदवारांना आघाडी मिळाली आहे.