डेहराडून :उत्तराखंडमध्ये सत्तेवर आल्यास आपल्या पक्षाचा ११ कलमी अजेंडा दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी सोमवारी जाहीर केला. भ्रष्टाचार संपवणे, तसेच सर्वाना मोफत दर्जेदार शिक्षण आणि वैद्यकीय उपचार देणे अशी आश्वासने त्यांनी दिली. उत्तराखंडला जगभरातील हिंदूंची आध्यात्मिक राजधानी बनवण्याचे आश्वासनही त्यात आहे.
उत्तराखंडमध्ये एकामागोमाग सत्तेवर असलेल्या काँग्रेस व भाजप सरकारांनी राज्याला ‘लुटल्याचा’ आरोप करून, केवळ आपला आम आदमी पक्षच लोकांना ‘प्रामाणिक पर्याय’ देऊ शकतो, असा दावा केजरीवाल यांनी केला. ‘तुम्ही भाजप किंवा काँग्रेस यांना आणखी पाच वर्षे दिलीत, तर काहीही बदलणार नाही. ते केवळ आपली तिजोरी भरतील,’ असे ते म्हणाले.
‘स्वच्छ हेतू असलेल्या पक्षाला निवडण्याची संधी तुम्हाला. गेल्या २१ वर्षांत काँग्रेस व भाजपने दिलेल्या भ्रष्ट सरकारांचा केवळ ‘आप’ हाच प्रामाणिक पर्याय आहे,’ असे केजरीवाल यांनी सांगितले.
रोजगार, बेरोजगारांना बेकारी भत्ता, मोफत व अखंडित वीज, चांगले रस्ते, अयोध्या, अजमेर शरीफ व कर्तारपूर साहिबची मोफत यात्रा, उत्तराखंडला जगभरातील हिंदूंची आध्यात्मिक राजधानी बनवणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सरकारी नोकऱ्या देणे आणि जवान, पोलीस व निमलष्करी दलाच्या शहिदांच्या भरपाईची रक्कम १ कोटी रुपयांपर्यंत वाढवणे, अशी आश्वासने पक्षाने दिली आहेत.