भाजपासाठी एक नवी डोकेदुखी समोर आलीय. उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असतानाच भाजपाच्या एका कॅबिनेट मंत्र्यांनी थेट राजीनाम्याची धमकी दिली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांचा विचार करता याचा भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री हरक सिंह रावत यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्याची धमकी दिलीय.
हरक सिंह रावत यांच्याकडे सध्या उत्तराखंडच्या जंगल, पर्यावरण, कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा कार्यभार आहे. ते मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठक सुरू असताना अचानक बैठक सोडून निघून गेले. त्यांच्या कोटद्वार या मतदारसंघातील प्रस्तावित वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयाच्या मुद्द्यावर राज्य सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय.
“नाराजी व्यक्त केली, अद्याप मंत्रीपदाचा राजीनामा नाही”
यावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक म्हणाले, “हरक सिंह रावत यांनी आपल्या मतदारसंघात प्रस्तावित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यात उशीर होत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. बैठकीत काहीही घडलेलं नाही, त्यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यांनी केवळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली आहे.” कौशिक यांनी पक्षात सर्वकाही ठीक असल्याचाही दावा केला.
राज्य सरकारचे प्रवक्ते सुबोध युनियाल यांनी रावत यांनी राजीनामा देण्याची धमकी दिल्याचं सांगितलं आहे. तसेच रावत यांच्याकडून राजीनामा पत्र मिळालं नसल्याचंही नमूद केलं. दरम्यान हरक सिंह रावत यांनी याआधी देखील आपल्या मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालय बांधण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याबाबत विधान केलंय.
“रावत पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण”
रावत यांनी २०१७ मध्ये काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. या संघर्षानंतर रावत पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याविषयी चर्चांना उधाण आलंय. ते १९९० मध्ये कल्याण सिंह सरकारमध्ये मंत्री देखील होते.
हेही वाचा : पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाहांकडून ‘या’ देणगीची पावती शेअर करत आवाहन, ट्वीटवर प्रतिक्रियांचा पाऊस
भाजपाने आधीच उत्तराखंडमध्ये दोन मुख्यमंत्री बदलले आहेत. त्यातच या राजकीय घडामोडींनी भाजपाची कोंडी झाली आहे. भाजपाने त्रिवेंद्र सिंह रावत आणि तिरत सिंह रावत यांना हटवलं होतं. सध्या उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी धामी यांना देण्यात आलीय.