नरेंद्र मोदी म्हणाले, “या लोकांचे सैन्याबाबत काय विचार आहेत हे उत्तराखंडचे लोक कधीही विसरू शकत नाही. जेव्हा भारताच्या सैनिकांनी दहशतवाद्यांच्या तळांवर सर्जिकल स्ट्राईक केलं तेव्हा हे लोक सैन्यवर प्रश्न उपस्थित करत होते. दिल्लीतील काही नेते तर टीव्हीवर येऊन सैन्याकडे पुरावे लागत होते. या लोकांनी जनरल बिपिन रावत यांना देशाचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनवण्यावरही राजकारण केलं होतं.”
“काँग्रेस मतांसाठी जनरल रावत यांचा राजकीय उपयोग करतंय”
“याच काँग्रेस पक्षाच्या नेत्याने बिपिन रावत यांना रस्त्यावरील गुंड म्हटलं होतं. हा या लोकांचा देशाच्या सैनिकांप्रती असलेला द्वेष आहे. आज हे लोक मतांसाठी जनरल रावत यांचा राजकीय उपयोग करू पाहत आहेत, तर त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी उत्तराखंडच्या लोकांची आहे,” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
“उत्तराखंडच्या लोकांनी कायम सजग रक्षकाप्रमाणे देशाचं संरक्षण केलं”
मोदी पुढे म्हणाले, “उत्तराखंडच्या लोकांनी कायम सजग रक्षकाप्रमाणे देशाचं संरक्षण केलंय. आज पौरी गरवालचे वीर सुपुत्र जनरल बिपिन रावत यांच्या स्मृती मला भावूक करत आहेत. त्यांनी उत्तराखंडच्या लोकांकडे केवळ पर्वताएवढं धाडसच नाही, तर हिमालयाप्रमाणे उंच विचार देखील असतात हे देशाला दाखवून दिलं.”
हेही वाचा : “भ्रष्टाचारावर कारवाई करायची असेल, तर गडकरींच्या घरापासून सुरुवात करा, कारण…” नाना पटोलेंचा गंभीर आरोप
“खुर्चीसाठी कोणी या स्तरापर्यंत जाऊ शकतं यावर विश्वास बसत नाही”
“माझ्या मनात खोलवर एक दुःख आहे. मला हा उल्लेख यासाठी करावा लागत आहे कारण काँग्रेस आपल्या प्रचारात जनरल बिपिन रावत यांचे कट आउट लावून, फोटो वापरून मतं मागत आहे. खुर्चीसाठी कोणी या स्तरापर्यंत जाऊ शकतं यावर माझा विश्वास बसत नाही,” असं म्हणत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं.