देशात सध्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. १० फेब्रुवारीला उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान झालं. त्यानंतर आता १४ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार असून त्यासोबतच इतर चार राज्यांमध्ये देखील प्रचार शिगेला पोहोचला आहे. उत्तराखंडमध्ये प्रचारात सहभागी झालेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद या दोन वेगळ्या संकल्पना असल्याचं मत व्यक्त केलं होतं. राहुल गांधींच्या या विधानावरून देशभर चर्चा झाली होती. त्यांच्या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बोलताना योगी आदित्यनाथ यांनी उत्तराखंडमधल्या प्रचारसभेत बोलताना टीका केली आहे.
“हिंदू ही आपली सांस्कृतिक ओळख आहे”
“सध्या एक नवीनच चर्चा सुरू आहे. हिंदूंचा किती अपमान करता येईल. ज्यांना स्वत:ला माहिती नाही की ते हिंदू आहेत की नाही, ते आता हिंदूची व्याख्या सांगत आहेत. स्वामी विवेकानंद यांनी म्हटलं होतं की गर्वाने बोला आपण हिंदू आहोत. हा कुठला धार्मिक शब्द नाही. हिंदु आपली सांस्कृतिक ओळख आहे. आपण जगात कुठेही गेलो, तरी याच शब्दाने ओळखला जातो”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
१८ डिसेंबर रोजी अमेठीमध्ये बोलताना राहुल गांधींनी हिंदुत्वाविषयी विधान केलं होतं. “मी तुम्हाला हिंदू म्हणजे काय ते सांगतो. हिंदू म्हणजे अशी व्यक्ती, जी फक्त सत्याच्या मार्गावर मार्गक्रमण करते, जी व्यक्ती कधीच घाबरत नाही, निडर असते आणि जी व्यक्ती कधीच तिच्या भितीचं रुपांतर हिंसा किंवा द्वेष किंवा रागात करत नाही. त्याचं सर्वोत्तम उदाहरण महात्मा गांधी आहेत”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले होते.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातला त्यांना अपेक्षित असलेला फरक देखील स्पष्ट केला. “महात्मा गांधींनी त्यांचं पूर्ण आयुष्य सत्य समजून घेण्यात घालवलं, तर दुसरीकडे गोडसे हा हिंदुत्ववादी होता. गोडसेला कुणीही महात्मा म्हणत नाही, कारण त्याने एका अशा हिंदूची हत्या केली, जे नेहमी सत्य बोलायचे. गोडसे हा घाबरट होता. एक कमकुवत माणूस होता. तो त्याच्या भितीचा सामना करू शकला नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.