दिवंगत सीडीएस बिपिन रावत यांचे लहान भाऊ कर्नल विजय रावत यांनी बुधवारी दिल्लीत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची भेट घेतली. त्यामुळे आता कर्नल विजय रावत हे भाजपामध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थित विजय रावत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्याची शक्यता पक्षाच्या सूत्रांनी आधीच स्पष्ट केली होती. अशा स्थितीत कर्नल विजय रावत यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर निवडणूक लढवण्याची शक्यताही जोर धरू लागली आहे.
“मी दिल्लीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची भेट घेतली. मी काही दिवसांत डेहराडूनमध्ये अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे,” असे ते म्हणाले. आज तकसोबत खास बोलताना कर्नल विजय रावत म्हणाले, “मला भाजपासाठी काम करायचे आहे. आमच्या कुटुंबाची विचारधारा भाजपाशी मिळतेजुळते आहे. जर भाजपाने तसे म्हटले तर मीही निवडणूक लढवणार आहे.”
उत्तराखंड विधानसभा निवडणूकीसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. कर्नल रावत यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या कुटुंबाची आणि भाजपाची विचारधारा खूप समान आहे. अशा परिस्थितीत त्यांना भाजपामध्ये जाऊन जनतेची सेवा करायची आहे. पक्षाची मान्यता मिळाल्यास आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी आहे.
दिवंगत सीडीएस बिपीन रावत उत्तराखंडमध्ये खूप सक्रिय होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी, केदारनाथ आणि गंगोत्री धामला भेट दिल्यानंतर, १९ सप्टेंबर २०१९ रोजी, सीडीएस म्हणून, त्यांच्या पत्नीसह, ते उत्तरकाशीच्या दुंडा ब्लॉकमध्ये असलेल्या त्यांच्या नानिहाल थाटी गावात पोहोचले आणि गावातील प्रत्येक ग्रामस्थांकडून खूप कौतुक करण्यात आले होते. गावातील प्रत्येक गावकऱ्याला त्यांच्याबद्दल खूप आपुलकी होती, त्यामुळे गावातील प्रत्येक माणसाला ते आपल्यात असल्याचा अभिमान वाटायचा.
या वेळी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून व पाहून येथील लोकांसाठी काहीतरी करण्याची ध्यास त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली होती. मला इथे काहीतरी करायचे आहे, असे त्यांनी सांगितले होते. गावकऱ्यांना संबोधित करताना रावत म्हणाले की, डोंगरातून होणारे स्थलांतर ही सर्वात मोठी चिंता आहे. त्यासाठी ते उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारशी वेळोवेळी बोलत असतात.
डोंगरांमध्ये मेडिकल कॉलेज आणि इंजिनीअरिंग कॉलेज सुरू होतील तेव्हा इथले तरुण स्थलांतर करणार नाहीत, असं ते म्हणाले होते. ज्यासाठी त्यांनी निवृत्तीनंतर पुन्हा इथे येईन आणि स्थलांतरामुळे बाधित झालेली गावे पुन्हा लोकवस्तीसाठी पुढाकार घेईन, असे आश्वासन दिले होते. उत्तराखंडच्या भेटीदरम्यान, दिवंगत सीडीएस रावत नेहमीच तिथल्या समस्या सोडवण्याबद्दल बोलायचे.
बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन
२०२१ मध्ये, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि इतर १२ जणांचा ८ डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. हा अपघात तामिळनाडूच्या कुन्नूर येथे झाला. या दुर्घटनेत ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमेव बचावले होते, त्यांचाही १५ डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता.