राज्यात एकीकडे सत्ताधारी महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना महाविकास आघाडीनं मात्र दोन दिवसांपूर्वीच जागावाटप जाहीर केलं. मात्र, या जागावाटपात काही जागांच्या बाबतीत झालेले निर्णय काही स्थानिक नेतेमंडळींना अद्याप रुचलेले नसल्याचं दिसत आहे. विशेषत: काँग्रेसमध्ये ही नाराजी दिसून येत आहे. सांगलीमध्ये विश्वजीत कदम व विशाल पाटील यांनी जाहीरपणे भूमिका मांडली असताना आता मुंबईतून वर्षा गायकवाड यांनी त्यांची नाराजी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे.
मुंबईत कसं झालंय जागावाटप?
मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या तीन पक्षांपैकी काँग्रेस व ठाकरे गट यांच्यात जागावाटप झालं आहे. त्यानुसार मुंबईतल्या सहा मतदारसंघांपैकी ४ मतदारसंघ ठाकरे गटाला तर २ मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. यानुसार उत्तर-मध्य मुंबई व उत्तर मुंबई या जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. तर ठाकरे गटाला दक्षिण मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई आणि ईशान्य मुंबई असे चार मतदारसंघ मिळाले आहेत.
“मुंबईत तीन जागा मिळायला हव्या होत्या”
वर्षा गायकवाड यांनी मुंबईबाबत झालेल्या जागावाटपावर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत काँग्रेसला ३ जागा मिळायला हव्या होत्या, असं त्या म्हणाल्या आहे. “मी माझ्या पक्षश्रेशींना माझं मत सांगितलं आहे. मी पूर्वीही बैठकांमधून, पत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नेते व दिल्लीतील आमच्या पक्षश्रेष्ठींना मत सांगितलं होतं. माझं हेच म्हणणं होतं की आम्हाला जागावाटपात हक्क मिळायला हवा. भले आमचे काही नेते गेले असले, तरी आमची मुंबईत पक्षसंघटना मजबूत आहे. मला अपेक्षा होती की आम्हाला किमान ३ जागा मिळाव्यात. कारण आम्ही बरोबरीत आहोत”, असं त्या म्हणाल्या.
सांगलीची जागा अखेर काँग्रेसनं सोडली; महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर, पाहा कोण कुठून निवडणूक लढवणार?
“पण एकदा पक्षानं भूमिका घेतल्यानंतर कार्यकर्ता म्हणून काम करणं ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे या निर्णयाचा आम्ही स्वीकार केला आहे. आघाडी असते तेव्हा मी सातत्याने सांगते की काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, काही गोष्टींचा स्वीकार करावा लागतो. आमचं काहीही म्हणणं असेल तर ते आम्ही आमच्या पक्षाला कळवू”, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
“कठोर भूमिका मांडायला हवी होती”
दरम्यान, यावेळी वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. “मुंबईचं अस्तित्व वेगळं आहे. मुंबईच्या बाबत चर्चा करत असताना आम्हाला अपेक्षा होती. संघटनेच्या, कार्यकर्त्याच्या काही अपेक्षा असतात. त्यांना वाटत असतं की पक्षाला प्रतिनिधित्व मिळायला हवं. काही जागांच्या बाबतीत कठोर भूमिका मांडायला हवी होती”, असं त्यांनी नमूद केलं.
“काही गोष्टी आणखी चांगल्या होऊ शकल्या असत्या”
“भिवंडी, सांगली, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या सर्व जागांबाबत आम्ही सातत्याने भूमिका मांडली आहे. मुंबईबाबत आम्ही याआधीही चर्चा केली आहे. आपला निकष जिंकणं हा असायला हवा. जो उमेदवार जिंकू शकतो, त्याला तिकीट दिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. मी अपेक्षा करते की मुंबईच्या बाबतीत झालेल्या निर्णयात काही गोष्टी अजून चांगल्या होऊ शकल्या असत्या”, असंही वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.