पुणे लोकसभा मतदारसंघ गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. मात्र, तिथे पोटनिवडणूक न घेतल्यामुळे आता पुण्यात नेमकं कोण निवडून येणार? यावर पुणेकरांमध्ये चर्चा पाहायला मिळत आहे. महायुतीकडून एकीकडे भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली असताना दुसरीकडे वसंत मोरेंमुळे मविआच्या उमेदवारीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, मविआनं पुण्यातून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे आता वसंत मोरेंनी थेट अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मनसेला रामराम, मविआची संधी गेली, आता…
पुण्यातील मनसेच्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचं सांगत वसंत मोरे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी मविआमधून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नही केले. मात्र, आता मविआकडून काँग्रेसच्या धंगेकरांना अधिकृतपणे उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आल्यामुळे आता वसंत मोरे काय करणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. यासंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचा मानस बोलून दाखवला.
“पक्षातून बाहेर पडल्यावर जास्त त्रास झाला”
“महाविकास आघाडीकडे मी उमेदवारी मागण्यासाठी गेलो नव्हतो. पुण्याची समीकरणं कशी जमू शकतात त्याचा तुम्ही विचार करा हे मी त्यांना सांगू इच्छित होतो. पण मला वाटतं की कदाचित मी थोड्या दिवसांत सांगेन की मनसेच्या पुण्यातल्या कोणत्या नेत्यांनी माझ्या वाटेत पुन्हा एकदा काटे टाकले. कुणी कुठे बैठका घेतल्या हे सांगेन. मला हे कळत नाही की पक्षात होतो तेव्हाही मला त्रास दिला गेला. पण आता पक्षातून बाहेर पडल्यानंतर उलट जास्त त्रास झाला”, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
“आता मी काय करतो हे सर्व पक्षांना कळेल”
“मला वाटतं की मी बाहेर पडल्यामुळे बऱ्याच जणांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना वाटलं की आता हा नक्की काय करतोय. जे कुणाला कधीच शक्य झालं नाही, ते शक्य करून दाखवतोय की काय. हा काय गणितं आखू शकतो? याची चिंता या लोकांना वाटायला लागली. त्यामुळे मी जी सांगड घालू पाहात होतो पुण्यात ती विस्कटली. पण मी विस्कटणार नाही. मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मी अपक्ष उमेदवारीवर ठाम आहे. आता मी कुणाकुणाला काय काय उपद्रव करतो हे पुणे शहरातल्या सर्व पक्षांना कळेल”, असा सूचक इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.
“पुण्यात मीच पहिल्या क्रमांकावर”
दरम्यान, पुणे लोकसभा निवडणुकीत आपणच पहिल्या क्रमांकावर राहणार असल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला आहे. “मी पुण्यात पहिल्या क्रमांकावरच राहीन. पुणेकरांचा उमेदवार मीच असेन. पुणेकरांनी वर्षभरापूर्वी गिरीश बापट यांचं निधन झालं तेव्हाच हे ठरवलं आहे. आता मी पक्ष, संघटना या सगळ्या गोष्टींना तिलांजली दिली आहे. आता मी निवडणूक लढण्याच्या पूर्ण तयारीत आहे. आत्ता नाही, दोन वर्षांपासून माझी तयारी चालू आहे”, असं वसंत मोरे म्हणाले.