तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी सात मे रोजी होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात अटीतटीच्या ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठीही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ७ मे साठीच्या मतदानासाठी प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. या मतदारसंघामध्ये आता आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान, आजच्या सुपर संडेला अजित पवार आणि शरद पवार गटाकडून तुफान प्रचार झाला. शेवटच्या प्रचारसभेला दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. एवढंच नव्हे रोहित पवार भावूक झाले तर, अजित पवारांनी यावरून त्यांची खिल्लीही उडवली.
रोहित पवार काय म्हणाले?
सुप्रिया सुळेंसाठी आज बारामतीमध्ये प्राचाराची सांगता सभा घेण्यात आली. यावेळी रोहित पवारांनी तुफान भाषण केलं. पण भाषण करताना ते भावूक झाल्याचं दिसले. रोहित पवार म्हणाले, “जेव्हा पक्ष फुटला, मी आणि काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी साहेबांबरोबर बसलो होतो. साहेबांशी आम्ही चर्चा करत होतो. साहेब टीव्हीकडे पाहत होते, चेहऱ्यावर त्यांनी दाखवलं नाही. टीव्हीकडे बघत बघत आम्ही काही प्रश्न केले आणि त्याचे त्यांनी उत्तर दिलं. बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं की हा जो आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, तो घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची आहे. जोपर्यंत नवी पिढी ती जबाबदारी घेत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवार साहेबांचे शब्द होते.”
असं बोलत असताना रोहित पवार भावूक झाले. थोडावेळ त्यांनी हुंदका आवरला आणि आवंढा गिळला. पण शेवटी डोळ्यांतून अश्रू आलेच. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तत्काळ त्यांना पाण्याची बॉटल आणून दिली.
डोळ्यांतील अश्रू पुसत ते पुढे म्हणाले की, “साहेब मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हे जे काही वक्तव्य केलं ते कृपा करून करू नका. तुम्ही आमचा जीव आहात. तुम्ही आमचा आत्मा आहात. मोठे नेते कितीही तुमच्याबरोबर असले तरीही सामान्य जनता आणि छोटे मोठे कार्यकर्ते तुमच्याबरोबर आहे.”
भावूक झालेल्या रोहित पवारांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
रोहित पवारांचं हे भाषण सुरू असताना सुनेत्रा पवारांसाठी बारामती येथे अजित पवार गटाची सभा सुरू होती. रोहित पवारांच्या भावूक होण्याचा व्हीडिओ अजित पवारांपर्यंत पोहोचला. त्यामुळे त्यांनीही त्यांच्या सांगता सभेत रोहित पवारांची खिल्ली उडवली.
अजित पवार म्हणाले, “शेवटच्या सभेत भावनिक करण्याचा प्रयत्न करतील असं मी सांगितलं होतं. आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यांतून पाणी काढून दाखवलं. मी ही दाखवतो. मलाही मतदान करा”, असं म्हणत अजित पवारांनी आधी कार्यकर्त्यांना मिश्किलीत डोळा मारला, खिशातील रुमाल काढला आणि डोळ्यांना लावला.
“ही असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत. तुम्ही कामं दाखवा. तुमचं खणखणीत नाणं दाखवा. हा झाला रडीचा डाव. हे असलं नाही चालत. यांना जिल्हापरिषदेचं तिकिट मी दिलं. शपथ घेऊन सांगतो खोटं बोलत नाही. साहेबांनी सांगितलं होतं अजिबात तिकिट देऊ नको. साहेबांनी नाही सांगितलं तरी मी दिलं. त्यानंतर ते म्हणाले हडपसरला उभं राहायचंय. पण तिथे चेतनची तयारी करतोय. तू कर्जत जामखेडला जात तिथे मदत करू, असं त्याला सांगितलं. आम्ही तुम्हाला राजकारणात बाळकडू पाजलं आणि तुम्हीच आमच्यावर टीका करता. तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त पावसाळे उन्हाळे पाहिलेले आहेत”, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.