Rahul Gandhi in Karnataka Swearing-in Ceremony : कर्नाटकात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाची तर, डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तसंच, आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली असून मंत्रिमंडळही सज्ज झाले आहे. त्यामुळे राहुल गांधींनी निकालाच्या दिवशी दिलेल्या आश्वासनानुसार पहिल्या मंत्रिमंडळात पाचही आश्वासाने पूर्ण करण्यात येणार आहेत. राहुल गांधी यांनी शपथविधी सोहळ्यात उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी कर्नाटकातील जनतेचे आभारही मानले.
राहुल गांधी म्हणाले, “कर्नाटकच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही पूर्णपणे काँग्रेस पक्षाला समर्थन दिलं. गेल्या पाच वर्षांत तुम्ही कोणती संकट झेलली आहेत हे आम्हाला माहितेय. कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर माध्यमातून खूप लिहिलं गेलं की ही निवडणूक काँग्रेस का जिंकली, रॅली झाल्या, थिएरी चालू केल्या वगैरे. पण या विजयाचं एकच कारण आहे, ते म्हणजे काँग्रेस पक्ष गरीब, कमजोर, दलित, आदिवासींसोबत उभा राहिला. आमच्याकडे सत्य आणि गरीब लोक होते. भाजपाकडे धन, दौलत, शक्ती, पोलीस सगळं काही होतं. त्यांच्या पूर्ण ताकदीला कर्नाटकच्या जनतेने हरवलं, त्यांच्या भ्रष्टाचाराला हरवलं. त्यांच्या द्वेषाला हरवलं.”
हेही वाचा >> Video : कर्नाटकच्या नव्या मंत्रिमंडळात कोण कोण? ‘या’ आठ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
“आम्ही रॅलीदरम्यान म्हटलं होतं की द्वेषाला हरवलं आणि प्रेम जिंकलं. द्वेषाच्या बाजारात कर्नाटकच्या लोकांनी प्रेमाचं दुकान उघडलं. गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचार सहन केला. आम्ही तुम्हाला पाच आश्वासने दिलं होते. १. गृहलक्ष्मी योजना- दोन हजार रुपये प्रत्येक महिलेला; २. गृहज्योती योजनेतून २०० युनिट वीज मोफत; ३. अन्नभाग्य योजनेतून १० किलो तांदूळ प्रत्येक कुटुंबीयाला; ४. शक्ती योजनेतून महिलांना संपूर्ण कर्नाटकात मोफत बसप्रवास; ५. युवानिधी योजनेतून तीन हजार रुपये प्रत्येक ग्रॅज्युएट्स आणि १५ ०० रुपये डिप्लोमाधारकाला मिळणार”, असा पुनरुच्चारही राहुल गांधींनी यावेळी केला.
“आम्ही खोटी आश्वासने देत नाही. जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो. एक-दोन तासांत कर्नाटकात पहिल्या कॅबिनेटची मिटिंग होईल. या कॅबिनेटमध्ये आम्ही दिलेली आश्वासने कायदे बनतील. शेतकरी, कामगार, लहान दुकानदार, त्याचं संरक्षण करणं आणि भविष्य चमकावणे हे सरकारचं लक्ष्य आहे. आम्ही तु्म्हला स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ. तुम्ही तुमचं प्रेम आणि शक्ती काँग्रेसला दिलीत हे काँग्रेस कधीच विसरणार नाही. हे सरकार कर्नाटकच्या जनतेचं सरकार आहे, आपलं सरकार आहे. आणि आम्ही मनापासून काम करू”, असं आश्वासनही राहुल गांधींनी केलं.