लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाकडून प्रचार सभा, रॅलीचे आयोजन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभांचा एकच धडाका लावल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर पुण्यातील वानवडी येथील रेस कोर्स मैदानावर पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाविजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या मंचावर महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरेही उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत होत असताना देवेंद्र फडणवीस यांनी अमित ठाकरेंची भेट घालून दिली. यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह महायुतीचे स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा >> मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही – नरेंद्र मोदी
जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवून आम्ही तिथे डॉ. बाबासाहेबांचे संविधान लागू केले आणि जनतेला दिलेला शब्द आम्ही पाळला. पण, हे काँग्रेसने आजवर का केले नाही? असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला.
देशाच्या स्वातंत्र्याला बराच कालावधी लोटला. पण, काँग्रेसने देशात गुलामगिरीची मानसिकता तशीच कायम ठेवली. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या नौदलावर अवघ्या विश्वाचा विश्वास असताना भारताच्या नौदलाच्या ध्वजावर मात्र ब्रिटिशांचे चिन्ह तसेच होते. नौदलाच्या या ध्वजावर आम्ही शिवमुद्रा आणली. जम्मू काश्मीरमध्ये देशाचे संविधान लागू झाल्याने तेथील जनतेला खऱ्याअर्थाने त्यांचे न्याय, हक्क मिळाल्याचा विश्वास मोदी यांनी दिला.
मागास वर्गावर अन्याय करण्याचे काँग्रेसचे धोरण
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने इतर मागास प्रवर्गात मुस्लिमांना घुसवून एका रात्रीत मुस्लिमांना इतर मागास वर्गाचे आरक्षण लागू करीत या वर्गाच्या २७ टक्के आरक्षणावर डाका टाकला. मुस्लिमांचे लांगुलचालन केले. आता हीच पद्धत देशभर राबवून इतर मागास वर्गावर अन्याय करण्याचे काँग्रेसचे धोरण असल्याचा आरोप मोदी यांनी केला.