Who is the Youngest Candidate in Maharashtra Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळणार आहे. तसेच मनसे, वंचित आणि इतर अपक्षांचे उमेदवारदेखील या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्षफुटीच्या राजकारणानंतर या निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदारसंघातून कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान, उमेदवार जाहीर झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दाखल केले. यावेळी प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती, शिक्षण, वय या गोष्टींची माहिती समोर आली. यावेळी महाराष्ट्रातील विधानसभा २०२४ मध्ये सर्वात कमी वयाचा उमेदवार कोण हेही समोर आले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील सर्वात कमी वयाचा उमेदवार कोण असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रोहित आर पाटील, त्यांचे वय २५ वर्ष आहे. रोहित पाटील हे माजी गृहमंत्री दिवंगत आरआर पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर रोहित पाटील आणि त्यांच्या मातोश्री यांनी सुमनताई पाटील यांनी शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेसकडून तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. पण, या मतदारसंघातून रोहित यांच्यासमोर माजी खासदार संजयकाका पाटील यांचे आव्हान आहे. संजयकाका पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत.
तासगाव मतदारसंघात १९९० पासून पाटील यांच्या कुटुंबाचे वर्चस्व आहे. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुमनताई पाटील २०१४ च्या पोटनिवडणुकीत आणि २०१९ च्या निवडणुकीत जिंकल्या होत्या, त्यामुळे सुमनताई पाटील यांच्यानंतर आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार रोहित पाटील जिंकले तर ते २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील सर्वात तरुण आमदार ठरतील.
रोहित पाटील यांच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा उल्लेख केल्याप्रमाणे, त्यांच्याकडे ३६ हजारांची रोख रक्कम आहे. त्यांच्या नावावर एकही गाडी नाही. तसेच त्यांच्या नावे एक लाख ६० हजार रुपयांचे दागिने आहेत. त्याचबरोबर २८ लाख ४२ हजार रुपये चल मालमत्ता आणि ८६ लाख ८० हजार रुपयांची अचल मालमत्ता आहे.