: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Big Fights महाराष्ट्र विधानसभेचा रणसंग्राम जवळ आला आहे. अवघ्या २७ दिवसांवर महाराष्ट्राची निवडणूक येऊन ठेपली आहे. मनसेने दुसरी यादी जाहीर करत ४५ जणांची नावं जाहीर केली आहेत. तर महायुतीने आत्तापर्यंत १८२ जणांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. मात्र मनसे फॅक्टर आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्हीही परिणाम करु शकतील अशी चिन्हंही आहेत. त्यामुळे येत्या काळात काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र महायुती, मनसे, वंचित आणि महाविकास आघाडी यामुळे काही ठिकाणी दिग्गजांसह तिरंगी लढती होणार आहेत. आम्ही तुम्हाला हीच माहिती देत आहोत. कुठल्या मतदारसंघात बिग फाईट ( Vidhansabha Big Fights ) रंगणार जाणून घ्या.
बिग फाईट क्रमांक १
माहीम या मतदारसंघातून पहिल्यांदाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे नशीब आजमावणार आहेत. राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे माहीमची लढाई मनसेसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना तिकिट दिलंय. तर महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित नसलं तरीही महेश सावंत यांना तिकिट मिळेल अशी चिन्हं आहेत. या बिग फाईटमध्ये ( Vidhansabha Big Fights ) नेमकं काय होतं पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
बिग फाईट क्रमांक २
ठाण्यात भाजपाने संजय केळकर यांना तिकिट दिलं आहे. तर त्यांच्या विरोधात मनसेचे फायरब्रांड नेते अशी ओळख असलेल्या अविनाश जाधव यांना तिकिट देण्यात आलं आहे. मविआचा या जागेवरचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. पण या ठिकाणीही बिग फाईट ( Vidhansabha Big Fights ) होणार हे निश्चित मानलं जातंय.
बिग फाईट क्रमांक ३
बेलापूर मतदारसंघ हा देखील हाय व्होल्टेज मतदारसंघ मानला जातो आहे. या मतदारसंघात भाजपाने मंदा म्हात्रेंना पुन्हा संधी दिली आहे. तर मनसेने त्यांचे प्रवक्ते आणि राज ठाकरे यांचे निकटवर्तीय गजानन काळेंना उमेदवारी दिली आहे. मविआचा या मतदारसंघातला उमेदवार जाहीर होणं बाकी आहे. बेलापूरमध्येही तिरंगी लढत दिसणार आहे.
हे पण वाचा- Mahayuti Candidate List 2024 : महायुतीच्या १८२ जागा जाहीर, महाविकास आघाडीचं जागावाटपाचं घोडं अडलेलंच!
बिग फाईट क्रमांक ४
पुण्यातल्या कोथरुड या मतदारसंघात भाजपाने चंद्रकांत पाटील यांना तिकिट दिलं आहे. तर मनसेने किशोर शिंदेंना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर व्हायचा आहे. त्यामुळे कोथरुडमध्येही तिरंगी लढत रंगणार आहे.
बिग फाईट क्रमांक ५
महाविकास आघाडीने आदित्य ठाकरेंची उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र वरळीतून आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे राहतील हे निश्चित मानलं जातं आहे. त्यांच्या विरोधात मनसेने संदीप देशपांडेंना उमेदवारी दिली आहे. संदीप देशपांडे हे मनसेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. तसंच या ठिकाणी महायुतीचाही उमेदवार असेलच. त्यामुळे या मतदारसंघातही तिरंगी लढत असणार हे निश्चित मानलं जातं आहे.