Sunil Raut in Vikhroli Vidhan Sabha Election 2024 : मुलुंड विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच विक्रोळी विधानसभा मतरादसंघ हा बहुभाषिक मतदारसंघ आहे. मराठी गुजराती असा भाषिक वाद येथे बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत या वादामुळे महाविकास आघाडीच्या संजय दीना पाटील यांना सर्वाधिक मते मिळाली. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे सुनील राऊत यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. पण शिवसेनेच्या फुटीनंतर निर्माण झालेल्या दोन गटांत येथे लढत झाल्यास भाषेचा मुद्दा मागे पडू शकतो.
१९९० साली लीलाधर डाके यांनी विक्रोळी विधानसभेवर भगवा फडकवला. ते सलग तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आले. दीना मामा पाटील यांचा पराभव करून ते पहिल्यांदा विधानसभेवर गेले. तेव्हापासून दिना पाटील कुटुंबिय आणि लीलाधर डाके यांच्यात थेट सामना होत राहिला. २००४ च्या निवडणुकीत संजय दीना पाटील यांनी लीलाधर डाके यांचा पराभव केला. तर, २००९ च्या निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या मनसेने मंगेश सांगळे यांना उमेदवारी दिली. लीलाधर डाके आणि संजय दीना पाटील या पारंपरिक उमेदवारांना मागे सारून मंगेश सांगळे यांनी येथील सत्ता काबिज केली.
हेही वाचा >> Mulund Assembly Constituency : गुजराती-मराठी वादात कोण मारणार बाजी? भाजपाच्या गडाला मविआ लावणार का सुरुंग?
२००८ मध्ये झालेल्या मतदार संघाच्या पुनर्रचनेमध्ये विक्रोळी विधानसभा हा भांडुप विधानसभेतून वेगळा झाला. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर मनसेचे मंगेश सांगळे हे आमदार बनले. मात्र, २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेने आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले. त्यातून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे निवडून आले. २०१९च्या निवडणुकीतही राऊत यांनी हा मतदारसंघ राखला. मराठी मतांची साथ आणि पालिका प्रभाग स्तरावर शिवसेना नगरसेवकांचे प्राबल्य या दोन्हींमुळे राऊत दुसऱ्यांदा आमदार बनले.
महायुतीत कोणाला मिळणार संधी?
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विक्रोळीतही शिवसेनेचे दोन गट पडले. उपेंद्र सावंत, सुवर्णा करंजे आणि चंद्रावती मोरे या माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता विधानसभेसाठी शिंदे गटातून सुवर्णा करंजे आणि विलास पारकर हे इच्छुक आहेत. भाजपामधूनही विक्रोळी मतदारसंघातून माजी नगरसेवक मंगेश पवार तसेच माजी आमदार मंगेश सांगळे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे भाजपा किंवा शिंदे गटाकडून मराठी उमेदवार रिंगणात उतरणार असल्यामुळे मराठी मतांचे थेट विभाजन होणार आहे. परिणामी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याचे सातत्य कायम ठेवण्याचे आव्हान ठाकरे गटासमोर राहणार आहे. तसंच, महायुतीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षानेही विक्रोळी विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याची चर्चा आहे. शरद पवार गटातील एक चेहरा लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालं होतं. याच चेहऱ्याला येथून देण्याची शक्यता आहे.
शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना
विक्रोळी विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीने शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या सुवर्णा कारंजे यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाविकास आघाडीने शिवसेना (उद्धव ठाकरे) सुनील राऊत यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तसेच मनसेने विश्वजित ढोलम यांना उमेदवारी दिली आहे.
मराठी मतांचं विभाजन होणार?
राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग येथे आहे. त्यामुळे ढोलम यांच्या पारड्यात ही मते पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) सुनील राऊत यांना या निवडणुकीत विजय मिळवून हॅटट्रिक साधायची आहे. तर २००९ मध्ये ४२ टक्के मते घेणाऱ्या मनसेचे मताधिक्य २०१४ मध्ये १८.९८ टक्के आणि २०१९ मध्ये १२.५४ टक्क्यांनी घटले. त्यामुळे मनसेला मतदारांना पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी कसब पणाला लावावे लागणार आहेत. शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) सुवर्णा करंजे यांनाही या निवडणुकीतून आपले अस्तित्त्व सिद्ध करायचे आहे. हे तिन्ही पक्ष मराठी माणसाचे प्रतिनिधित्व करणारे असल्याने या भागातील मराठी मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची शक्यता आहे. मात्र हे विभाजन किती प्रमाणात होते, ते कोणासाठी लाभदायक ठरते किंवा कोणासाठी त्रासदायक ठरते याबाबत उत्सुकता आहे.
ताजी अपडेट
विक्रोळी विधानसभा मतदारसंघ मुंबई उपनगरात येतो. मुंबई उपनगरात ५५.७७ टक्के मतदान झालं आहे.
नवीन अपडेट
विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून सुनील राऊत यांनी ६६ हजार ९३ मते मिळवून विजय मिळवला आहे. तर, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या सुवर्णा कारंजे यांना ५ हजार ५६७ मते मिळाली आहेत.