Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आजपासून सुरू झाला आहे. देशभरातील १०२ लोकसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झाली असली तरी उत्तर प्रदेशच्या पीलीभीत आणि कैराना लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी एका गावाने मतदानावर बहिष्कार घातला आहे. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ होत आहे. अधिकारी वर्ग नाराज ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे. गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन देऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.
पीलीभीत मतदारसंघातील बकसपुर गावातील गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मतदानावर बहिष्कार घातला आहे. याची माहिती मिळाल्यानंतर निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधिकारी गावात आले. त्यांनी लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. गावातील एका जुन्या रहदारीच्या रस्त्याला प्रशासनाने बंद केल्यामुळे बकसपुर गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अरेरावी केल्याचाही आरोप गावकऱ्यांनी केला.
ग्रामस्थांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, गावात अनेक दशकांपासून ऑफिसर्स कॉलनीमधून जाणारा रस्ता रहदारीसाठी ते वापरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने हा रस्ता बंद केला. याची तक्रार केल्यानंतर त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. उलट प्रशासनातील अधिकाऱ्यानी गावकऱ्यांनाच सुनावले. याचा राग मनात धरून गावकऱ्यांनी आज मतदानाच्या दिवशी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला. प्रशासनाने अखेर पायवाट म्हणून रस्ता वापरण्याची परवानगी दिली, मात्र गावकरी शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकलने प्रवास करण्याचीही मागणी लावून धरली आहे.
तर दुसरीकडे कैराना लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या एका गावानेही अशाचप्रकारे मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. कैरानाच्या रसूलपुर गुजरान या गावातील लोकांनी सांगितले की, त्यांच्या गावाने २०१९ साली ९५ टक्के मतदान केले होते. मात्र त्यानंतर गावातील काही लोकांवर खोट्या केसेस टाकण्यात आलेल्या आहेत. मागच्या पाच वर्षांत सरकारने आमच्याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही, असा आरोप या गावातील लोकांनी केला. याही गावातील मतदारांची समजूत घालण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.