Premium

प. बंगालमध्ये मतदानावेळी हिंसाचार, जमावाने EVM, VVPAT मशीन तलावात फेकल्या; जाधवपुरात बॉम्बहल्ला

संदेशखाली भागात झालेल्या हिंसाचाराबाबत माहिती देताना पोलीस म्हणाले, भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काही स्वयंसेवकांना मारहाण केली होती. तेव्हापासून या हिंसेला सुरुवात झाली.

mob throws EVM VVPAT machine in pond
पश्चिम बंगालमधील पोलेरहाट भागातही हिंसाचार झाला आहे. (PC : Indian Express)

पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहारसह देशातील आठ राज्यांमधील एकूण ५७ मतदारसंघांमध्ये आज (१ जून) लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया चालू आहे. मतदानादरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आज पुन्हा एकदा हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कुलतली भागात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन तलावात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. संतप्त जमावाने येथील एका मतदान केंद्रावर हल्ला करून येथील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन हिसकावल्या आणि पाण्यात फेकून दिल्या आहेत. कुलतली यथील बूथ क्रमांक ४० आणि बूथ क्रमांक ४१ वर ही घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, पोलेरहाट भागातही हिंसाचार झाला आहे. या हिंसाचारात आयएसएफ आणि सीपीआयएमचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. आयएसएफ आणि सीपीआयएमच्या समर्थकांनी दावा केला आहे की, त्यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. दरम्यान, या भागातील हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांची मोठी तुकडी पोलेरहाटमध्ये दाखल झाली आहे.

कुलतली आणि पोलेरहाटमधील हिंसाचाराच्या घटनेचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये दिसतंय की, पोलीस जमावाच्या मागे धावत आहेत. हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला. पोलिसांनी लाठीहल्ला सुरू करताच जमाव चारही दिशांना पांगला. पोलिसांच्या भीतीने काही कार्यकर्त्यांनी तलावात उड्या मारल्या. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यासह संदेशखाली आणि भांगर भागातूनही हिंसाचाराच्या बातम्या समोर येत आहेत. बशीरहाट लोकसभा मतदारसंघातील संदेशखाली येथे शुक्रवारी रात्रीपासून हिंसाचार सुरू झाला आहे. आज सकाळी सात वाजता मतदान सुरू झालं, तेव्हादेखील या भागात हिंसाचार चालू होता. हा हिंसाचार रोखण्यासाठी, मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या भागात पोलिसांच्या अधिक तुकड्यांना पाचारण करण्यात आलं असून मागील काही तासांपासून येथील परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री या परिसरातील महिलांनी काठी आणि झाडू हाती घेऊन मोर्चा काढला होता.

हे ही वाचा >> “लोकशाहीसाठी अनेकांनी रक्त सांडलंय, त्यामुळेच…”, मतदानानंतर कंगना रणौतचं वक्तव्य

संदेशखाली भागात झालेल्या हिंसाचाराबाबत माहिती देताना पोलीस म्हणाले, भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काही स्वयंसेवकांना मारहाण केली होती. तेव्हापासून या हिंसेला सुरुवात झाली. तर भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, तृणमूल काँग्रेसचे नेते पोलिसांच्या मदतीने त्यांना धमक्या देत आहेत. तसेच हा सगळा हिंसाचार तुरुंगात कैद असलेले तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहाँ यांच्या गुंडांनी घडवून आणल्याचा आरोपही या महिलांनी केला आहे. दरम्यान, मतदानावेळी जाधवपूरमध्ये देशी बॉम्बच्या सहाय्याने हल्ला झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Violence in west bengal angry mob throws evm vvpat machine in pond during lok sabha elections asc

First published on: 01-06-2024 at 14:11 IST
Show comments