महाविकास आघाडीत सांगली लोकसभेची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाली असून ठाकरे गटाने या मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र काँग्रेसचे सांगलीतील नेते विशाल पाटील यांनी पक्ष आणि महाविकास आघाडीविरोधात शड्डू ठोकला आहे. विशाल पाटील सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, पक्षाविरोधात भूमिका घेतल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटील यांना कारवाईचा इशारा दिला होता. मात्र हा इशारा देऊन १० दिवस उलटले तरी काँग्रेसने कारवाईच्या दृष्टीने अद्याप कोणतीही पावलं उचललेली दिसत नाहीत. अशातच विशाल पाटील यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, त्यांच्यावर कदाचित कारवाई होणार नाही.
विशाल पाटील म्हणाले, मला नाही वाटत की काँग्रेस पक्ष माझ्यावर कारवाई करू शकेल. कारण मी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवत नाहीये. मी तर काँग्रेसच्या मतदारांसाठी लढतोय, काँग्रेसची संघटना टिकवण्यासाठी, त्यांचे विचार टिकवण्यासाठी, काँग्रेसचा एक सच्चा स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून ही निवडणूक लढवत आहे. काँग्रेस पक्षासाठी आमच्या घराचं खूप मोठं योगदान आहे. इतक्या मोठ्या योगदानानंतर मला वाटत नाही की काँग्रेस पक्ष असा कुठला निर्णय (माझ्यावर कारवाई करण्याचा) घेईल.
मी काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता आहे, काँग्रेसच्या विचारधारेचा पाईक आहे. गेल्या ९० वर्षांपासून आमचं कुटुंब काँग्रेससाठी झटतंय. आमच्या कुटुंबाने काँग्रेस पक्षाला यशस्वीरित्या सांगलीसह महाराष्ट्रात नेहमीच मोठं यश मिळवून दिल आहे. आमच्या माध्यमातून पक्षाला सातत्याने यश मिळत गेलं आहे. त्यामुळे मला नाही वाटत की माझ्यावर कारवाई होईल. मला याबाबत पूर्ण विश्वास आहे.
काँग्रेसकडून कारवाईस टाळाटाळ
विशाल पाटील यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत गुरुवारी काँग्रेसचा मेळावा पार पडली. या मेळाव्यात पाटलांविरुद्ध पक्षाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई टाळली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र असा निर्णय घेताना सांगलीतील मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करावेत, असं आवाहनही मेळाव्यात करण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला. या वेळी पटोले यांनी मविआच्या उमेदवारीवर काँग्रेसचा नैसर्गिक हक्क असताना तो डावलून उबाठा शिवसेनेच्या वाटय़ाला सांगलीची जागा दिली गेली. यामागे एक मोठे षडय़ंत्र असून, त्याचा योग्य वेळी खुलासा होईलच, पण सद्य:स्थितीत भाजपचा पराभव करायचा या हेतूने आघाडी धर्माचे पालन करून मविआचा उमेदवार विजयी करणे सर्वाची जबाबदारी आहे असेही पटोले यांनी सांगितले.