Warora Assembly Constituency : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा मतदारसंघ आहेत. त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे वरोरा विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ राज्यकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत प्रतिभा धानोरकर या वरोरा मतदारसंघाच्या आमदार होत्या. मात्र, नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला. त्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता ही जागा रिक्त झाली आहे. दरम्यान, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका कसा राहिला आहे? गेल्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघाची सद्यस्थिती काय? याविषयी जाणून घेऊया.
वरोरा विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास?
वरोरा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. २००९ च्या मतदारसंघ फेररचनेनुसार या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली होती. त्यापूर्वी हा भाग भद्रावती मतदारसंघाचा भाग होता. २००९ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे संजय देवतळे विजय झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये सुरेश धानोरकर, तर २०१९ मध्ये प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला होता.
हेही वाचा – आर्वीत राजकीय भूकंप, भाजप बंडखोर दादाराव केचे यांना महाराष्ट्राबाहेर हलविले
आधीच्या निवडणुकांची आकडेवारी काय सांगते?
२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने संजय देवतळे यांना उमेदवारी दिली होती. तर शिवसेनेने सुरेश धानोरकर यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत संजय देवतळे यांनी सुरेश धानोरकर यांचा पराभव केला होता. त्यांना एकूण ५१ हजार ९०४ मते मिळाली होती, तर धानोरकर यांना ४८ हजार १६४ मते मिळाली होती. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार अनिल बुजोने तिसऱ्या स्थानावर राहिले होते. त्यांना ३० हजार ९८२ मते मिळाली होती. तर बसपाच्या राजू देवगडे यांना ७ हजार ३०४ मते मिळाली होती.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत संजय देवतळे यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली. तर सुरेश धानोरकर यांना पुन्हा शिवसेनेने उमेदवार दिली. या निवडणुकीत सुरेश धानोरकर यांचा विजय झाला. त्यांना एकूण ५३ हजार ८७७ मते मिळाली, तर संजय देवतळे यांना एकूण ५१ हजार ८७३ मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. आसावरी विजय देवतळे या तिसऱ्या स्थानावर होत्या. त्यांना एकूण ३१ हजार ३३ मते मिळाली होती.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश धानोरकर यांनी शिवसेनेचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे २०१९ मध्ये त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकरांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. तर संजय देवतळे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला. त्यांना एकूण ६३ हजार ८६२ मते मिळाली, तर संजय देवतळे यांना एकूण ५३ हजार ६६५ मते मिळाली. या निडवणुकीत मनसेचे रमेश राजूरकर हे ३४ हजार ८४८ मतांसह तिसऱ्या स्थानावर होते.
हेही वाचा – Warora Vidhan Sabha Constituency: वरोऱ्यात काँग्रेस, भाजपमध्ये बंडाचे वारे
या मतदारसंघाची सद्यस्थिती काय?
वरोरा विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने प्रवीण काकडे यांना उमेदवारी दिली आहे. प्रवीण काकडे हे खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ आहेत. दुसरीकडे भाजपाने करण देवतळे यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय वरोऱ्यातून मनसेचे प्रवीण सूर आणि इतर बंडखोर अपक्ष म्हणून रिंगणात आहे. मात्र, असं असलं तर वरोरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपा यांच्यात थेट लढत होईल, अशी चर्चा आहे. महत्त्वाचे म्हणजे चंद्रपूरमध्ये सध्या प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे काँग्रेसला या मतदारसंघात अंतर्गत संघर्षाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.