वरोरा विधानसभा मतदारसंघ : काँग्रेसला अंतर्गत संघर्षाचा फटका बसणार? कशी आहे या मतदारसंघाची सद्यस्थिती?

या मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका कसा राहिला आहे? गेल्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघाची सद्यस्थिती काय? याविषयी जाणून घेऊया.

warora assembly constituency
वरोरा विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय? ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा मतदारसंघ आहेत. त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे वरोरा विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ राज्यकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत प्रतिभा धानोरकर या वरोरा मतदारसंघाच्या आमदार होत्या. मात्र, नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला. त्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता ही जागा रिक्त झाली आहे. दरम्यान, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका कसा राहिला आहे? गेल्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघाची सद्यस्थिती काय? याविषयी जाणून घेऊया.

वरोरा विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास?

वरोरा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. २००९ च्या मतदारसंघ फेररचनेनुसार या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली होती. त्यापूर्वी हा भाग भद्रावती मतदारसंघाचा भाग होता. २००९ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे संजय देवतळे विजय झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये सुरेश धानोरकर, तर २०१९ मध्ये प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला होता.

हेही वाचा – नागपूर दक्षिण-पश्चिम: भाजपाच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांना कुणाशी द्यावी लागेल लढत?

आधीच्या निवडणुकांची आकडेवारी काय सांगते?

२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने संजय देवतळे यांना उमेदवारी दिली होती. तर शिवसेनेने सुरेश धानोरकर यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत संजय देवतळे यांनी सुरेश धानोरकर यांचा पराभव केला होता. त्यांना एकूण ५१ हजार ९०४ मते मिळाली होती, तर धानोरकर यांना ४८ हजार १६४ मते मिळाली होती. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार अनिल बुजोने तिसऱ्या स्थानावर राहिले होते. त्यांना ३० हजार ९८२ मते मिळाली होती. तर बसपाच्या राजू देवगडे यांना ७ हजार ३०४ मते मिळाली होती.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत संजय देवतळे यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली. तर सुरेश धानोरकर यांना पुन्हा शिवसेनेने उमेदवार दिली. या निवडणुकीत सुरेश धानोरकर यांचा विजय झाला. त्यांना एकूण ५३ हजार ८७७ मते मिळाली, तर संजय देवतळे यांना एकूण ५१ हजार ८७३ मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. आसावरी विजय देवतळे या तिसऱ्या स्थानावर होत्या. त्यांना एकूण ३१ हजार ३३ मते मिळाली होती.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश धानोरकर यांनी शिवसेनेचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे २०१९ मध्ये त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकरांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. तर संजय देवतळे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला. त्यांना एकूण ६३ हजार ८६२ मते मिळाली, तर संजय देवतळे यांना एकूण ५३ हजार ६६५ मते मिळाली. या निडवणुकीत मनसेचे रमेश राजूरकर हे ३४ हजार ८४८ मतांसह तिसऱ्या स्थानावर होते.

हेही वाचा – साकोली मतदारसंघ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गड राखणार? की भाजपा बाजी मारणार?

या मतदारसंघाची सद्यस्थिती काय?

प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर वरोरा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकर हे इच्छूक असल्याची माहिती आहे. तर अनिल धानोरकर यांच्या उमेदवारीला विजय वडेट्टीवार यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. चंद्रपूरमध्ये सध्या प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे काँग्रेसला अंतर्गत संघर्षाचा सामना करावा लागतो आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीत या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाने तसेच भाजपाने दावा केला आहे. ही जागा जर शिंदे गटाला सोडण्यात आली, तर बंडखोरी अटळ आहे, इशाराच भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी दिली आहे. तर शिंदे गट या जागेसाठी आग्रही आहे. याशिवाय रमेश राजुरकर आणि ओमप्रकाश मांडवकर यांची नावेही चर्चेत आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Warora assembly constituency congress pratibha dhanorkar bjp eknath shinde faction spb

First published on: 21-10-2024 at 19:35 IST
Show comments