सध्या लोकसभेची निवडणूक सुरु आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यावर विचार करता येऊ शकतो असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायाधीश दीपांकर दत्ता, आणि न्यायाधीश संजीव खन्ना यांचं खंडपीठ केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर निर्णय देऊ शकतं. जामीन अर्जावर आता ७ मे रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईडी आणि अरविंद केजरीवाल यांचे वकील यांनी सुनावणीच्या तयारीत रहावं असं म्हटलं आहे. बार अँड बेंचने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे?
अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर ७ मे रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालय अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर विचार करेल. सर्वोच्च न्यायालय पुढच्या सुनावणीच्या दरम्यान अंतरिम जामीन कुठल्या अटींवर मिळतो ते देखील ईडीने तयार ठेवायचं आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आम्ही त्या दिवशी म्हणजेच ७ मे रोजी अंतरिम जामीन द्यायचा की नाही द्यायचा हे आपण ठरवू असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
हे पण वाचा- केजरीवालांना निवडणुकीपूर्वी अटक का करण्यात आली? सर्वोच्च न्यायालयाचा ईडीला सवाल
मंगळवारी सकाळी १०.३० ला सुनावणीला सुरुवात होईल. सुनावणी लांबणार असेल तर आम्ही अंतरिम जामिनावर विचार करु. सर्वोच्च न्यायालयाने ईडीला हा प्रश्नही विचारला आहे की अरविंद केजरीवाल तुरुंगातून फाईल्सवर सह्या करु शकतात का? मंगळवारी आम्ही तुम्हाला याबाबतही विचारु शकतो.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगात
दिल्लीतील कथित मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली. ईडीने गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. दिल्ली उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास आणि कोणतेही संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. केजरीवाल हे अटक झालेले आजवरचे पहिले मुख्यमंत्री आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आम आदमी पक्षातील ते तिसरे ज्येष्ठ नेते आहेत. यापूर्वी आपचे खासदार संजय सिंह आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनादेखील मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आली आहे.