पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दुखापतग्रस्त झाल्या आहेत. हेलिकॉप्टरची पायरी चढत असताना त्यांचा पाय निसटला आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ममता बॅनर्जी दुर्गापूरहून आसनसोल या ठिकाणी जात होत्या. तृणमूलचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांचा प्रचार करण्यासाठी त्या चालल्या होत्या त्यावेळी त्यांचा अपघात झाला.
नेमकं काय घडलं?
ममता बॅनर्जी रॅलीसाठी निघाल्या. त्यांनी हेलिकॉप्टरचा पर्याय निवडला. त्यामुळे दुर्गापूर या ठिकाणाहून आसनसोल या ठिकाणी जात होत्या. तितक्यात त्यांचा पाय निसटला. त्यांचा तोल जाणार होता. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना पडू दिलं नाही. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ममता बॅनर्जींना गंभीर दुखापत झाली नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
तृणमूलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपचार घेतल्यानंतर ममता बॅनर्जी आसनसोल या ठिकाणी गेल्या आहेत. आसनसोल या ठिकाणी त्या रॅलीला संबोधितही करणार आहेत. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी घरातल्या आवारात फिरत असताना पडल्या त्यावेळी त्यांच्या डोक्याला इजा झाली होती. त्यांना त्यावेळी तातडीने एसएसकेम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या डोक्याला जखम झाली होती. त्यानंतर त्यांच्या डोक्याला काही टाकेही पडले. या घटनेनंतर आता आज पुन्हा एकदा त्यांना दुखापत झाली आहे.