अनेक संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी त्यांचे लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल्स जाहीर केले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार देशात भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळणार आहे. तर इंडिया आघाडीचा अद्याप देशात फारसा प्रभाव नसल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, काही संस्थांनी देशभरातील महत्त्वाच्या मतदारसंघांचं सर्वेक्षण करून त्या जागांवर कोणता उमेदवार जिंकेल याबाबतचे एक्झिट पोल्स जाहीर केले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघांचाही समावेश आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेस आणि भाजपात प्रतिष्ठेची लढाई पाहायला मिळणार आहे. अमेठी हा गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार स्मृती ईराणी यांनी या मतदारसंघात राहुल गांधींचा पराभव केला होता. यावेळी राहुल गांधी यांनी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवली नाही. तर ते रायबरेली या त्यांच्या आईच्या म्हणजेच सोनिया गांधींच्या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. सोनिया गांधी यांनी यावर्षी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. दुसऱ्या बाजूला, भाजपाने या मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी केली होती.
बहुसंख्य एक्झिट पोल्समध्ये दावा करण्यात आला आहे की, अमेठीत पुन्हा एकदा स्मृती ईराणी या विजयी होतील. केवळ एका एक्झिट पोलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अमेठीत काँग्रेस उमेदवार के. एल. शर्मा विजयी होऊ शकतात.
अमेठीचा एक्झिट पोल
संस्था | स्मृती ईराणी | के. एल. शर्मा |
POLSTRAT | विजयी | पराभव |
ETC | विजयी | पराभव |
स्कूल ऑफ पॉलिटिक्स | पराभव | विजयी |
महापोल | विजयी | पराभव |
अॅक्सिस | विजयी | पराभव |
दुसऱ्या बाजूला, रायबरेलीत राहुल गांधींचा विजय होईल, असा अंदाज सर्वच एक्झिट पोल्समध्ये व्यक्त करण्यात आला आहे. भाजपाने दिनेश प्रताप सिंह यांना रायबरेलीतून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. काँग्रेसने अगदी शेवटच्या क्षणी राहुल गांधी यांना रायबरेलीतून लोकसभेचं तिकीट दिलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांना येथे प्रचार करण्यासाठी फार वेळ मिळाला नव्हता. मात्र राहुल गांधींच्या अनुपस्थितीत त्यांची थोरली बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका-गांधी वाड्रा यांनी रायबरेलीत काँग्रेसचा जोरदार प्रचार केला होता. रायबरेलीच्या कानाकोपऱ्यात काँग्रेसचं जाळं आहे, जे राहुल गांधींना विजयी करेल असं दिसतंय.
रायबरेलीचा एक्झिट पोल
संस्था | राहुल गांधी | दिनेश प्रताप सिंह |
POLSTRAT | विजयी | पराभव |
अॅक्सिस | विजयी | पराभव |
ETC | विजयी | पराभव |
महापोल | विजयी | पराभव |
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान शनिवारी (१ जून) सायंकाळी पार पडलं. त्यानंतर अनेक संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी त्यांचे मतदानोत्तर चाचण्यांचे अहवाल (एक्झिट पोल) जाहीर केले. त्यानुसार देशात भाजपाप्रणित रालोआला (एनडीए) सरासरी ३५० हून अधिक जागा मिळू शकतात. तर, विरोधी पक्षांची इंडिया आघाडी ही जेमतेम १२५ ते १५० जागांपर्यंत मजल मारू शकेल, असा दावा करण्यात आला आहे.